लोकसत्ता टीम
वर्धा: नागपूर अधिवेशनात २९ डिसेंबर २०२२ ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकवीस हजार सहाशे ओबीसी विद्यार्थ्यांना दरवर्षी स्वाधार योजनेचा लाभ देण्याची घोषणा केली होती. छगन भुजबळ यांनी एसटी, एससी विद्यार्थ्यांप्रमाणे ओबीसी विद्यार्थ्यांना बाहेरगावी शिकण्यासाठी वर्षास साठ हजार रुपये देणारी ज्ञानज्योती स्वाधर योजना लागू करण्याची मागणी केल्यावर फडणवीस यांनी मंजूर केल्याचे उत्तर दिले होते, असे महात्मा फुले समता परिषदेने स्पष्ट केले. पण अद्याप हा आदेश निघालेला नाही.
तसेच ओबीसींसाठी बहात्तर शासकीय वसतिगृहे सुरू करण्याचा निर्णय झाला. पण कार्यवाही काहीच झालेली नाही. म्हणून त्वरित आदेश फडणवीस यांनी द्यावे. महज्योतीचे पुण्यातील कार्यालय त्वरित सुरू करावे. या मागण्यांची तत्काळ अंमलबजावणी करावी, अन्यथा दोन जूनपासून उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या मतदारसंघात बेमुदत उपोषण सुरू करणार, असा इशारा समता परिषदेच्या दिवाकर गमे, नीलकंठ पिसे, विनय डहाके, कविता मुंगळे आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून दिला.