अकोला : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी अमरावती येथे महात्मा गांधींसह महात्मा जोतिबा फुले यांच्यावरही खळबळजनक टीका केली होती. याचे तीव्र पडसाद उमटले. त्यानंतर दोनच दिवसात संभाजी भिडे यांनी यू टर्न घेतला. अकोला जिल्ह्यातील पातूर येथे त्यांनी महात्मा फुलेंच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. त्यामुळे संभाजी भिडेंच्या दुहेरी भूमिकेवरून आता चर्चा रंगत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान अकोला विभागाच्यावतीने संभाजी भिडे यांचे व्याख्यान रविवारी आयोजित करण्यात आले होते. संभाजी भिडेंनी महात्मा फुलेंसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करून गरळ ओकली होती. या विधानावरून माळी समाजामध्ये संतापाची तीव्र लाट निर्माण झाली. संभाजी भिडेंच्या अकोला जिल्हा दौऱ्याला अखिल भारतीय मराठा महासंघ, समता परिषद, वंचित बहुजन आघाडी आदींनी तीव्र विरोध केला. वाशिम येथून अकोला शहरात येतांना पातूर येथील मंदिराला भेट देण्याचा संभाजी भिडे यांचा नियोजित कार्यक्रम होता.

हेही वाचा >>>कार्यकर्ते टिकवण्यासाठी ‘चॉकलेट’ वाटण्याशिवाय पर्याय नसतो! राजकीय विवशतेबाबत नितीन गडकरींची कबुली

दरम्यान, पातूर येथे महात्मा फुलेंच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्याची विनंती संभाजी भिडेंना करण्यात आली. त्यांनी ती तात्काळ मान्य केली. महात्मा फुलेंच्या पुतळ्याला अभिवादन करून संभाजी भिडे नतमस्तक झाले. अमरावती येथे टीका आणि अकोला जिल्ह्यात अभिवादन, त्यामुळे संभाजी भिडेंची नेमकी भूमिका कोणती? असा सवाल केला जात आहे.

हेही वाचा >>>गडकरींनी सांगितले कार्यकर्त्याचे महत्त्व; म्हणाले, “सायकल कितीही चांगली असली तरी..”

काळे झेंडे, नारेबाजी

संभाजी भिडेंच्या अकोला जिल्हा दौऱ्याला वंचित बहुजन आघाडी, अखिल भारतीय मराठा महासंघ, समता परिषदेने तीव्र विरोध केला. पातूर येथून अकोल्यात येण्याचा संभाजी भिडे यांचा नियोजित मार्ग बदलण्यात आला. तरी देखील त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून जोरदार नारेबाजी करण्यात आली. पोलिसांनी असंख्य कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sambhaji bhide garlanded statue of mahatma phule at patur in akola district akola ppd 88 amy
Show comments