मुंबई एनसीबीचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडे, क्रांती रेडकर व त्यांचे कुटुंब दोन दिवसापासून जिल्ह्यात दाखल झाले आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्या मूळ गावी व जिल्ह्यात विविध सामाजिक कार्यक्रमात त्यांची वाढती उपस्थिती चर्चेचा विषय बनला आहे. आपण सामाजिक कार्यात स्वतः ला वाहून घेणार असून विविध खेळ आणि स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारे असून सध्यातरी राजकारणापासून दूर असल्याचे समीर वानखेडे सांगत असले तरी त्यांच्या जिल्ह्यातील वाढत्या भेटींमुळे राजकीय गोटात मात्र विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.
हेही वाचा >>> चंद्रपूर : ऐकावं ते नवलचं! माकडाचा दफनविधी, समाधीस्थळानंतर आता कृषी भवनात भजन किर्तन
समीर वानखेडे यांचे मूळ गाव रिसोड तालुक्यातील वरूड तोफा हे आहे. सिने अभिनेता शाहरुख खान यांच्या मुलावर केलेल्या कारवाईमुळे ते प्रकाशझोतात आले होते. त्यांच्या जात प्रमाणपत्रावरून देखील चांगलाच वाद रंगला होता. समीर वानखेडे दोन दिवसापासून जिल्ह्यात दाखल झाले आहेत. यापूर्वी ते एकटेच दाखल झाले होते. परंतु यावेळेस मात्र कुटुंबासह ते विविध कार्यक्रमात सहभागी होत आहेत. १५ डिसेंबर रोजी रिसोड तालुक्यातील सवड येथे कबड्डी स्पर्धेत ते उपस्थित होते. त्यानंतर १६ डिसेंबर रोजी वाशीम शहरातील नालंदानगर येथील विहारात समाज बांधावासह उपस्थित राहून त्यांनी अनेकांशी चर्चा केली.