अकोला : मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सम्राट डोंगरदिवे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मविआचे ते जिल्ह्यातील पहिले उमेदवार ठरले. राष्ट्रवादीने पक्षात नव्याने आलेल्यांना संधी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून गुरुवारी सायंकाळी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीमध्ये मूर्तिजापूरमधून सम्राट डोंगरदिवे यांना उमेदवारी दिली. गेल्या विधानसभा निवडणुकीत आघाडीमध्ये मूर्तिजापूर मतदारसंघातून राष्ट्रवादीच लढली होती. मूर्तिजापूरमध्ये २०१९ मध्ये तिरंगी लढत झाली होती. त्यामध्ये राष्ट्रवादीचे रवी राठी यांना तिसऱ्या क्रमांकाची ४१ हजार १५५ मते मिळाली होती. यावेळेस देखील मविआमध्ये मूर्तिजापूर मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी सुटेल, असा अंदाज होता. राष्ट्रवादीकडून लढण्यासाठी सम्राट डोंगरदिवे व रवी राठी इच्छूक होते. दोघांनीही गेल्या काही दिवसांपासून तयारी सुरू केली होती. उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असतांना आज उमेदवारीची माळ सम्राट डोंगरदिवे यांच्या गळ्यात टाकण्यात आली आहे. डोंगरदिवे यांनी काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता.
हेही वाचा…अहेरीत पिता-पुत्रीत थेट लढत; शरद पवार गटाकडून भाग्यश्री आत्राम यांना उमेदवारी
u
मूर्तिजापूर मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. या मतदारसंघात गेल्या वेळेस काट्याची लढत देणाऱ्या वंचित आघाडीने डॉ. सुगत वाघमारे यांना उमेदवारी दिली आहे. मूर्तिजापूरमध्ये भाजपचे विद्यमान आमदार असतांना पक्षाच्या पहिल्या यादीत त्यांना स्थान मिळाले नाही. त्यामुळे भाजपचा उमेदवार जाहीर होण्याची प्रतीक्षा असून मूर्तिजापूरमध्ये यावेळेस देखील तिरंगी लढतीचा अंदाज आहे.
अकोला जिल्ह्यात बसपचे चार उमेदवार
जिल्ह्यातील चार मतदारसंघात बहुजन समाज पक्षाने आपले उमेदवार दिले आहेत. बाळापूर मतदारसंघातून भाग्यश्री गवई, अकोला पश्चिम डॉ. धनंजय नालट, अकोला पूर्व तुषार शिरसाट व मूर्तिजापूर मतदारसंघातून रमेश इंगळे यांना बसपने गुरुवारी उमेदवारी जाहीर केली.
हेही वाचा…दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांची लूट! खासगी ट्रॅव्हल्सविरोधात तक्रारीसाठीचा क्रमांक बंद…
दोन मतदारसंघात प्रत्येकी एक अर्ज
जिल्ह्यातील अकोला पूर्व आणि अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एका उमेदवाराकडून अर्ज दाखल करण्यात आले आहे. अकोला पूर्वतून अजाबराव टाले (अपक्ष), तर अकोला पश्चिममधून डॉ. धनंजय नालट यांनी बसपकडून तीन अर्ज दाखल केले. अकोला पूर्व मतदारसंघात आतापर्यंत ३५ जणांकडून ५८ अर्ज, अकोला पश्चिम मतदारसंघात ६८ व्यक्तींनी १३० अर्ज, मूर्तिजापूरमध्ये ४२ जणांनी ९९ अर्ज, अकोटमध्ये ६४ जणांनी १०२ अर्ज, तर बाळापूरमध्ये आतापर्यंत ४२ व्यक्तींनी ८३ अर्जांची उचल केली आहे. शेवटच्या काही दिवसांमध्ये अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उसळेल.