अमरावती : बुलढाणा जिल्‍ह्यात समृद्धी महामार्गावर गेल्‍या १ जुलै रोजी झालेल्‍या भीषण अपघातात २५ जणांचा मृत्‍यू झाला, या अपघातासंदर्भात एक धक्‍कादायक माहिती समोर आली असून अपघाताच्‍या वेळी बसचा चालक हा मद्यधूंद अवस्‍थेत असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. बसचालकाच्‍या रक्‍ताच्‍या नमुन्‍यामध्‍ये ०.०३ टक्‍के म्‍हणजे १०० मिलीलीटर रक्‍तात ३० मिलीग्रॅम अल्‍कोहोल आढळून आल्‍याचे अमरावती येथील प्रादेशिक न्‍यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्‍या अहवालात म्‍हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अपघातग्रस्‍त बसचा चालक शेख दानिश याला पोलिसांनी अटक केली आहे. शेख दानिश याच्‍या रक्‍ताचे नमुने घेण्‍यात आले. रासायनिक विश्‍लेषण अहवालानुसार अपघाताच्‍या वेळी त्‍याच्‍या रक्‍तामध्‍ये अल्‍कोहोलची मर्यादा ही कायदेशीर मान्‍यतेपेक्षा जास्‍त होती. न्‍यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेने विक्रमी वेळेत २५ पैकी २३ मृतदेहाची डीएनए चाचणी पूर्ण केली असून दोन मृतदेहांचे अहवाल अद्याप यायचे आहेत. संपूर्ण अहवाल पोलीस यंत्रणेकडे सोपविण्‍यात आले आहेत, अशी माहिती प्रादेशिक न्‍यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे नागपूर आणि अमरावती येथील उपसंचालक डॉ. विजय ठाकरे यांनी ‘लोकसत्‍ता’ला दिली.

हेही वाचा >>>नवीन विद्यापीठ व्यावहारिकदृष्ट्या अयोग्य? अपुऱ्या निधीमुळे अमरावती विद्यापीठाचेच कार्य प्रभावित

प्रयोगशाळेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अह‍वाल तयार करण्‍यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. एरवी, अशा प्रकारच्‍या चाचण्‍यांचे अहवाल तयार करण्‍यासाठी सात ते आठ दिवसांचा कालावधी लागतो, पण ते तीन ते चार दिवसांत तयार करण्‍यात आले, असे ठाकरे यांनी सांगितले. गेल्‍या १ जुलै रोजी नागपूरहून पुणे येथे जात असलेली विदर्भ ट्रॅव्‍हल्‍सची बस दुभाजकावर धडकून उलटल्‍यानंतर बसने पेट घेतला होता. या अपघातात बसचा चालक, वाहक बचावले होते, पण २५ जणांचा होरपळून मृत्‍यू झाला होता.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samriddhi highway bus accident driver was under the influence of alcohol regional forensic science laboratory report mma73 amy
Show comments