बुलढाणा : जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील दुसरबीड टोल नाक्या जवळील पुलावरचा लोखंडी अँगल तुटून पडल्याने अनेक वाहनांचे टायर फुटून अपघात झाले. अनेक गाड्यांचे यामधे नुकसान झाले. प्रवाशांना लवकर मदतही मिळाली नाही. त्यामुळे टोल वाढविला पण प्रवाशांच्या आणि वाहनांच्या सुरक्षिततेचे काय, असा संतप्त सवाल प्रवाशांनी केला.

काल मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा धक्कादायक घटनाक्रम घडला. लोखंडी अँगल तुटून वर आल्याने अनेक गाड्या यावेळी महामार्गावर अडकून पडल्या होत्या. अनेक वाहनांचे टायर फुटल्याने वाहने रस्त्यात अडकून पडल्या. त्यांना लवकर मदत मिळाली नाही, असा आरोप चालकांनी केला. अखेर काही वेळानंतर किनगाव राजा पोलिस घटनास्थळी पोहचले. त्यांनी वाहतूक सुरळीत केली. नुकसानग्रस्त वाहने प्रवाशांनी टोल नाक्यावर लावून पुढच्या प्रवास सुरू केला. मात्र काहींना तिथेच थांबावे लागले. प्राप्त माहितीनुसार कमी अधिक दहा वाहनाचे टायर फुटले. बहुतेक वाहनांच्या एअर बॅग उघडल्याने जीवित हानी टळली. मात्र पुलावरील उखडलेल्या लोखंडी भागाची तत्काळ दुरुस्ती केली नाही तर भीषण दुर्घटना व जीवित हानी होण्याची दाट शक्यता आहे.

अखेर पोलीस आले

एका प्रवाशाने संतप्त प्रतिक्रिया दिली. दुसरबीड टोलनाक्या पासून दोन किलोमीटर अंतरावर पुलावर उखडलेल्या लोखंडी अँगलने आमच्या चार चाकी वाहनाचे समोरील दोन्ही टायर फुटले. यामुळे वाहन अनियंत्रित झाले. आम्ही कसेबसे बचावलो. याशिवाय आणखी अनेक वाहनांचे टायर फुटले.घटनास्थळ वरून जेमतेम दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या दुसरबीड टोल नाक्यावर फोन लावून अपघातची माहिती दिली. मात्र तिथून काहीच मदत मिळाली नाही. यामुळे किनगाव राजा ( तालुका सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा ) पोलीस ठाण्याला फोन लावला. तेथील पोलीस निरीक्षक नरवाडे हे तत्काळ घटना स्थळी आले. त्यांनी वाहने बाजूला करुन आणि बारिकेट्स लावून वाहतूक सुरळीत केली. यांनतर वाहन नाक्या जवळ लावून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो असे या प्रवशाने सांगितले.