वर्धा : बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर १ जुलै रोजी झालेल्या भीषण अपघातात २५ लोकांचा बळी गेला होता. त्यावेळी राज्य शासनाने प्रत्येक मृताच्या कुटुंबास पाच लाख रुपये सानुग्रह मदत देण्याची घोषणा केली होती. तसेच पंतप्रधान कार्यालयाकडून प्रत्येकी दोन लाख रुपये देण्याचे जाहीर झाले होते. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ७० लाख रुपये जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाले आहे, तर पंतप्रधान सहाय्यता निधीतून मिळणारी मदत थेट कुटुंबाच्या खात्यात जमा झाले, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी दिली.
वितरण नियोजन करणारे तहसीलदार कोळपे म्हणाले की, एका कुटुंबास मदत देण्यात आली असून आज इतर कुटुंबांना मदत देण्यात येईल. तसे निरोप त्यांना देण्यात आले आहे,अशी माहिती त्यांनी दिली.या अपघातात वर्धा जिल्ह्यातील १४ प्रवाशी बळी गेलेत.त्यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी खासदार रामदास तडस, आमदार डॉ.पंकज भोयर,जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व तहसीलदार चमू उपस्थित होती. घटनेनंतर योग्य ती कारवाई होत नसल्याबद्दल कुटुंबीयांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती.तसेच हा प्रश्न केंद्राकडे उपस्थित करण्याची मागणी केल्यावर खासदारांनी लोकसभेत ही बाब मांडली.आता निधी तत्परतेने वितरित होत आहे.त्यात दिरंगाई होणार नसल्याची खात्री जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.