नागपूर : समृद्धी महामार्ग नागरिकांच्या सुविधेसाठी तयार झाला खरा, पण हा महामार्ग सुविधेपेक्षाही अपघाताच्या घटनांनी अधिक प्रसिद्ध होत आहे. उदघाटनापूर्वी दोन काळविटांची या महामार्गावर लागलेली शर्यत, त्यानंतर माकडसह इतर वन्यप्राण्यांचा मृत्यू आणि आता दोन दिवसांपूर्वी वाहनाच्या धडकेत एक, दोन नाही तर १४ रानडुकरांचा मृत्यू झाल्याने या महामार्गावर वन्यप्राण्यांसाठी घेतलेल्या उपशमन योजनांवर प्रश्नचिन्ह उभे झाले आहे.

हेही वाचा >>> गडचिरोली : आंतरराज्यीय पुलाच्या बांधकामाविरोधात आदिवासी आक्रमक; महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर संघर्षाची स्थिती

या महामार्गावर भारतीय वन्यजीव संस्थेच्या शास्त्रज्ञांच्या मदतीने उपशमन योजना आखण्यात आल्या. त्यासाठी वनखाते, स्वयंसेवी यांची समिती गठीत करण्यात आली, पण प्रत्यक्षात या सर्व प्रक्रियेत गांभीर्याचा अभाव असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. बुधवारी भरधाव वाहनाने हिंगणानजीकच्या समृद्धी महामार्गावर रानडुकरांचा कळप चिरडला गेला. प्रत्येक दिवसाला या महामार्गावर वन्यप्राण्यांचे बळी जात आहेत. समृद्धी महामार्ग हा बराचसा जंगलातून आणि जंगलालगत वन्यप्राण्यांच्या अधिवासातून गेला आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचे संचारमार्ग ओळखून त्या त्या ठिकाणी भुयारी मार्ग व उड्डाणपूल तसेच वळणमार्ग तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, या जागांची ओळख चुकल्याचे आता स्पष्ट झाले आहे. कोट्यवधी रुपये या उपशमन योजनांवर खर्च करण्यात आले, पण कामातील गांभीर्याचा अभाव आता वन्यप्राण्यांच्या मुळावर उठला आहे.

Story img Loader