वाशिम: मोठया थाठात सुरु करण्यात आलेला समृद्धी महामार्ग अल्पावधितच प्रवासी, चालकांसाठी त्रासदायक ठरू लागला आहे. या मार्गांवर अपघात ग्रस्त वाहनाचे टायर चोरून नेणे, लूटमार, रात्रीच्या वेळी गुंडगिरी केली जात असल्याचा आरोप करणारी चित्रफित सोशल मीडियावर प्रसारित होत असताना राज्याचे बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी समृद्धी महामार्गाचा धावता आढावा घेतला असला तरी प्रवासी, चालकांच्या सुरक्षेच कोडे मात्र कायम आहे.
राज्य सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग नागरिकांना सोईचा झाला असला तरी सध्या वादात सापडला असून या मार्गावर ३० नोव्हेंबरपर्यंत ७३ गंभीर अपघात होऊन यामध्ये १४२ जणांना प्राण गमवावे लागले. त्यातच या महामार्गावर अपघातग्रस्त वाहनाचे टायर चोरून नेले जात आहेत. गुंडगिरी वाढली आहे.
मात्र यावर कुणाचेही नियंत्रण नसून पोलीस प्रशासन व राज्य सरकारने याकडे लक्ष देऊन वाहन चालकांनी काळजी करावे, असे आवाहन करणारी चित्रफित सध्या सोशल मीडियावर प्रसारित होत असतानाच बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला जाताना मालेगाव तालुक्यातील टोलनाक्यावर आढावा घेतल्याचे केवळ सोपस्कार पार पाडले आहेत का? सुधारणा करण्याबाबतच्या सूचना दादा भुसे यांनी देऊनही अधिकाऱ्याकडून वाटाण्याच्या अक्षदा लावल्याने दादा भुसे यांनी आढावा बैठकीत छत्रपती संभाजीनगर ते वाशिम दरम्यानच्या पाहणी दौऱ्यातील कामाबद्दल नाराजी व्यक्त केली. यावरून अधिकारी मंत्र्यांच्या सूचनांची दखल घेत नसल्याचे दिसून येत आहे.