देवेंद्र गावंडे

प्रादेशिक विकासाचे गाजर दाखवत मोठ्या टेचात बांधलेला महामार्ग हा समृद्धीचा नाहीच, हा मृत्यूचा महामार्ग आहे. या मार्गाच्या बळावर गब्बर झालेले राज्यकर्ते हे वास्तव कधीच स्वीकारणार नाहीत. कंत्राटधार्जिणा विकास काय असतो याचे उत्तम उदाहरण म्हणून या मार्गाकडे बघता येईल. याचा अर्थ पायाभूत सुविधा नकोच, भव्य रस्ते नको असा नाही. दळणवळणाच्या सुविधा जेवढ्या जास्त तेवढा विकासाचा वेग अधिक हे सूत्र मान्यच. तरीही हा महामार्ग अनेक प्रश्न उभे करतो. सुमारे ५४ हजार कोटी रुपये खर्चून या मार्गाचा शिर्डीपर्यंतचा पहिला टप्पा सुरू झाला. म्हणजे एका किलोमीटरसाठी साधारणपणे एक हजार कोटीचा खर्च. वारेमाप असे वर्णन करता येईल असा. हा सर्व खर्च वसूल होणार तो जनतेच्या खिशातून. तरीही हा मार्ग रोज नवनवे दोष दाखवून देत असेल तर याला समृद्धी म्हणायचे की दुर्गती! पहिला टप्पा सुरू होऊन अद्याप सहा महिने व्हायचे असताना यावर झालेल्या अपघातांची संख्या आहे ३५४. त्यातले १०७ गंभीर. त्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ५८. यावर सरकारचा पहिला युक्तिवाद असा की राज्यात इतर ठिकाणी घडणाऱ्या अपघातांच्या तुलनेत ही संख्या नगण्य. तो पूर्णपणे फसवा. राज्यात इतरत्र होणारे अपघात जास्त, कारण त्यावरची वाहतूक मोठी. त्या तुलनेत समृद्धीवर वाहतूक अगदी कमी तरीही अपघात जास्त. लोक वाहने योग्य पद्धतीने चालवत नाहीत. नियम पाळत नाहीत हा सरकारचा दुसरा युक्तिवाद. तोही सपशेल खोटा. या मार्गाच्या बांधणीतच खोट आहे. इतका सरळ रेषेतला मार्ग उभारताना त्यावर ‘महामार्ग संमोहन’चे प्रकार घडू शकतात हे सरकारच्या लक्षात कसे आले नाही?

Devendra Fadnavis Dharni, Chikhaldara Skywalk Work,
‘चिखलदरा स्‍कायवॉकचे काम महाविकास आघाडीने थांबविले’, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणीसांचा आरोप
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
mallikarjun kharge criticize pm narendra modi in nagpur
पंतप्रधान देशाचे असतात, पण मोदी मात्र सर्व चांगले प्रकल्प आपल्याच गृहराज्यात…खरगेंची जोरदार टीका
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
Assembly Elections 2024 Akkalkuwa-Akrani Assembly Constituency Congress
लक्षवेधी लढत: अक्कलकुवा: लोकसभेतील पराभवाचे उट्टे काढणार का?
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Pramod Mahajan Death Poonam Mahajan
‘प्रमोद महाजनांच्या हत्येमागे गुप्त हेतू’; पूनम महाजन म्हणाल्या, “आता अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांना…”
Assembly Election 2024 Malegaon Outer Constituency Dada Bhuse print politics news
लक्षवेधी लढत: मालेगाव बाह्य : मंत्री दादा भुसे यांचा मार्ग यंदा खडतर

हे पण वाचा Buldhana Accident : “मला तिथे घेऊन चला…..” अपघातात लाडकी मुलगी सापडल्याचं कळताच आईचा आर्त टाहो!

या मार्गाच्या आराखड्यावर हजारो कोटी रुपये खर्च केले गेले. तज्ज्ञांनी तो तयार केला असे दाखले दिले गेले. त्यापैकी कुणाच्याही लक्षात हा प्रकार कसा आला नाही? ‘संमोहन’चा हा प्रकार जगभर प्रचलित. तो दूर करायचा असेल तर मार्गावर मोठे फलक लावणे, थांबे विकसित करणे हे ओघाने आलेच. ते न करता हा मार्ग खुला करण्याची घाई का करण्यात आली? चालक एकदा संमोहनावस्थेत गेला की अपघात घडतात. हे साधे तत्त्व सरकारच्या लक्षात कसे आले नाही? आम्ही विकास केला, तोही जलदगतीने हे मिरवता यावे म्हणून उद्घाटनाची घाई केली का? वाहने बेदरकारपणे चालवणाऱ्यांची संख्या भारतात सर्वाधिक हे मान्य. म्हणून सारा दोष चालकांवर ढकलून स्वत: नामानिराळे राहण्याचा आव आणायचा हे सरकारला शोभणारे नाही. या मार्गावर समोरासमोर वाहनांची टक्कर होण्याची शक्यता नाही. तरीही एवढे अपघात होत असतील तर बांधणीच सदोष असा निष्कर्ष सहज काढता येतो. हा मार्ग भारतीय रस्ते महासभेने ठरवून दिलेल्या निकषानुसारच बांधण्यात आला हा सरकारचा आणखी एक दावा. तो खरा असेल तर इतके अपघात का होताहेत? या अपघातांना माध्यमे अवाजवी महत्त्व देतात हा आणखी एक आक्षेप. तोही अर्धसत्य. हजारो कोटीचा हा मार्ग सर्वाधिक सुरक्षित असेल असे सर्वांनी गृहीत धरलेले. त्यात माध्यमेही आलीत. तरीही रोज अपघात घडत असतील तर त्याला प्रसिद्धी मिळणारच. बांधकामावर प्रश्नचिन्ह उभे ठाकणारच. या साऱ्या प्रकाराला इतरांना दोषी ठरवत सरकारला हात झटकता येणार नाही. शिर्डी ते भगूर हा याच महामार्गाचा टप्पा अगदी काही दिवसापूर्वी सुरू झाला. त्याचेही स्वागत अपघातानेच झाले. यावरून बांधणीत आरंभापासूनच दोषाचा जंतू शिरलाय हेच स्पष्ट होते. गंभीर बाब म्हणजे या अपघातसत्रावर राज्यातील एकही पक्ष वा नेता बोलायला तयार नाही. मार्गाच्या सदोषपणावर आक्षेप घ्यायची कुणाची तयारी नाही. सत्ताधाऱ्यांचे ठीक. ते बोलू शकणार नाहीत पण विरोधकांच्या चुप्पीचे काय? याचे उत्तर या मार्गनिर्मितीमागील अर्थकारणात दडलेले.

हे पण वाचा- Buldhana Accident: “समृद्धी महामार्गावरचा अपघात आणि २५ जणांचा मृत्यू ही घटना….” देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

या रस्त्याने राजकारणात सक्रिय असलेल्या एकजात सर्वांना समृद्ध करून टाकले. कुणीही ओरडणार नाही याची योग्य ती काळजी आरंभापासून घेण्यात आली. त्यामुळे आजही साऱ्यांची तोंडे बंद दिसतात. मग सामान्य प्रवासी मोठ्या संख्येत मरतात त्याचे काय? हा मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखा प्रकार नाही का? या साऱ्यांना खूश करण्याच्या नादात मार्गाची किंमत वाढली असा कुणी अर्थ काढला तर त्यात चूक काय? समृद्धीची उभारणी करतेवेळी सरकारकडून मोठमोठी स्वप्ने लोकांना दाखवण्यात आली. उद्योग व कृषीविकास हे त्यातले एक. त्यातल्या कृषीविकासाला अजून वेळ आहे हे गृहीत धरले तरी उद्योगाचे काय? या मार्गावरून उद्योगाशी संबंधित वाहतूक वाढली का? त्यामुळे या क्षेत्राला चालना मिळण्यास मदत झाली का हे प्रश्न अजून अनुत्तरित. सध्यातरी या मार्गावर जड वाहतुकीचे प्रमाण कमी. ते वाढले की अपघात वाढतील हे ठरलेले. मग केवळ लोकांचे जीव घेण्यासाठी हा मार्ग बांधला का? आजही या मार्गावर सार्वजनिक प्रवासी वाहतूक कमीच. कारण पथकरामुळे खर्च वाढतो. प्रवासी अधिकचे पैसे मोजायला तयार नाहीत. तरीही अपघात जास्त. त्यात मरणारे प्रामुख्याने मध्यमवर्गीय व सुखवस्तू कुटुंबातील. ज्यांच्याकडे चारचाकी वाहन व पथकराचा भार सोसायची तयारी असेच लोक यावरून प्रवास करतात व काहींना मृत्यूला सामोरे जावे लागते. राज्याच्या शिरपेचातला तुरा अशी ओळख मिरवणाऱ्या या मार्गावरचे मृत्यूसत्र सरकारची मान खाली घालायला लावणारे. दुर्दैव हे की हे वास्तव राज्यकर्ते स्वीकारायलाच तयार नाहीत.

मार्ग सुरू झाल्यामुळे ‘तृप्ती’ची ढेकर देत सारे या अपघातांकडे मूकपणे बघू लागलेले. खरेतर यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांनी सरकारवरच भरपाईचे दावे ठोकायला हवेत. तशी मानसिकता आपल्या समाजात अजून रुजलेली नाही. त्याचा पुरेपूर फायदा सरकारकडून उचलला जातोय. सिमेंटचे रस्ते हे वेगवान वाहतुकीसाठी योग्य नाहीत. त्यामुळे वाहनांची व टायरची झीज लवकर होते. अपघाताचे प्रमाण वाढते हे जगभर मान्य असलेले संशोधन. परिणामी प्रगत देशात डांबरी रस्त्यांनाच प्राधान्य दिले जाते. भारतात नेमके उलटे सुरू आहे. देशातील सर्व सिमेंट कंपन्या चालवण्याची जबाबदारी जणू आपलीच या थाटात सिमेंटची रस्तेबांधणी सुरू आहे. त्याचा फटका सामान्यांना बसतोय. समृद्धी हे त्यातले एक उत्तम उदाहरण! सध्या तर एकही असा दिवस जात नाही की ज्या दिवशी समृद्धीवर अपघात घडत नाही. त्यात कुणी मेले की बातमी होते अन्यथा किरकोळ अपघात दुर्लक्षित राहतात. असा अपघातप्रवण मार्ग खरोखर समृद्धी आणू शकेल काय? या दुर्दैवाच्या दशावताराला जबाबदार सरकारला नाही तर आणखी कुणाला धरायचे? या पार्श्वभूमीवर या संपूर्ण महामार्ग प्रकरणाची सखोल चौकशी व अंकेक्षण होणे गरजेचे. तशी हिंमत सरकार दाखवेल का?