समृद्धी महामार्गावर लोकार्पणापूर्वीच धोकादायक वाहतूक सुरू आहे. त्यामुळे हा महामार्ग जीवघेणा ठरत आहे. बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर आतापर्यंत झालेल्या दोन अपघातात तिघांना आपला जीव गमवावा लागला.
या महामार्गाचे काही टप्प्यातील काम पूर्ण झाले. मात्र, अद्याप त्याचे लोकार्पण करण्यात आलेले नाही. लोकार्पणाचा कार्यक्रम दोन वेळा स्थगित करून पुढे ढकलण्यात आला. निकृष्ट कामावरूनसुद्धा समृद्धी महामार्ग चर्चेत आहे.
मेहकर येथील काही व्यावसायिक औरंगाबाद येथून समृद्धी महामार्गावरून परत येत असताना त्यांच्या वाहनाला अपघात झाला. मुसळधार पाऊस सुरू झाल्याने तांदुळवाडी शिवारात चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटले. त्यामुळे वाहन महामार्गावरील दुभाजकाला आदळले आणि खड्ड्यात पडले. या भीषण अपघातात व्यावसायिक बळीराम खोकले यांचा मृत्यू, तर दोन जण गंभीर जखमी झाले.
अपघातात कार अक्षरश: चक्काचूर झाली. यापूर्वी देखील बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर अपघात होऊन दोन बळी गेले होते.