बुलढाणा : हिंदूहृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी दृतगती महामार्ग प्रारंभीपासूनच लहान-मोठ्या अपघातांनी गाजत आहे. त्यातही रस्ते संमोहन आणि चालकाला पहाटे लागलेली डुलकी ही अपघाताची मुख्य कारणे ठरली आहेत. आज पहाटे झालेल्या दोन अपघातांचे कारण चालकांना लागलेली डुलकीच आहे. सुदैवाने यात प्राणहानी झाली नसली तरी तिघे भाविक गंभीररित्या जखमी झाले असून सहाजण किरकोळ जखमी झाले. तसेच दोन प्रवासी वाहनाचे मोठे नुकसान झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुंभमेळ्यातून परतले अन्…

आज सकाळी झालेल्या वाहन अपघातात चालकासह तिघे भाविक गंभीर जखमी झाले. तसेच दोन लहान बालकांसह सहाजण किरकोळ जखमी झाले. समृद्धी महामार्गच्या मुंबई कॉरिडोरवरील चॅनेल क्र. ३४६.५ वर हा अपघात झाला. प्रयागराज येथील कुंभामेळ्यातून दर्शन घेऊन नऊ भाविक अर्टिगा कारने (क्र. एमएच-४३-बीवाय-६९८१) नवी मुंबईकडे परत जात होते. दरम्यान, चालक संजय संतोष त्रिपाठी (३२, रा. नवी मुंबई) यांना कार चालवताना डुलकी आली. यामध्ये अनियंत्रित झालेली कार अगोदर डाव्या साईडच्या ‘क्रॅशबॅरीअर’ला धडकली. धडकेचा वेग इतका होता की कार उलटी फिरून उजव्या साईडच्या ‘बॅरिअर’ला समोरून धडकली. यानंतर महामार्गावर अक्षरशः आडवी झाली. सुदैवाने यावेळी मागेहून येणारे दुसरे वाहन नसल्याने संभाव्य भीषण अनर्थ टळला.

अपघातग्रस्त कारमध्ये एकूण नऊ प्रवासी प्रवास करीत होते .त्यापैकी संजय गुप्ता (४०), त्यांची पत्नी सुनीता संजय गुप्ता, ज्योती दिलीप गुप्ता (३२), सर्व राहणार नवी मुंबई हे गंभीर जखमी झाले. तसेच दिलीप गुप्ता (३२), संगीता विनोद गुप्ता (३९), विनोद गुप्ता (४९), आरव संजय गुप्ता (२ वर्षे), सार्थक दिलीप गुप्ता (४ वर्षे), सर्व राहणार नवी मुंबई हे किरकोळ जखमी झाले. त्यांना महामार्ग रुग्णवाहिकेचे डॉक्टर अक्षय विघ्ने, चालक शैलेश दळवी व महामार्ग सुरक्षा दलाचे जवान भगवान गायकवाड, सचिन नाईक, अजय पाटील यांच्या मदतीने तत्काळ उपचारसाठी जालना येथे हलवण्यात आले. अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या साह्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. सिंदखेड राजा पोलीस पुढील तपास करीत आहे.

डुलकी लागली अन् कार ट्रकला धडकली

दुसऱ्या अपघातात चालकाला डुलकी लागल्याने कार समोरच्या वाहनाला धडकली. सुदैवाने चालक बचावला असला तरी वाहनाचे मोठे नुकसान झाले. वॅग्नार कार (क्र. एम.एच. १२ व्ही.टी. ८४६६)चे चालक सुदर्शन गोरे (४०, रा. पुणे) हे वाशीमवरून पुणे येथे जात होते. समृद्धी महामार्गाच्या मुंबई कॉरिडोरवर त्यांना डुलकी लागली. त्यामुळे त्यांची कार समोरून जात असलेल्या अज्ञात ट्रकला धडकली. यामध्ये सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. मात्र कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. समृद्धी ‘क्यूआरव्ही’ चमू सिंदखेड राजाचे गणेश महाजन, नयन बोर्डे, निखिल ताकबते घटनास्थळी दाखल झाले. महामार्ग पोलीस विभागाचे पोलीस उपनिरीक्षक शैलेश पवार, हवालदार विठ्ठल काळुसे, संदीप किरके, अरुण भुतेकर यांनी अपघातग्रस्त वाहन महामार्गाच्या बाजूला केले. यानंतर वाहतूक सुरळीत झाली.