बुलढाणा : पंत प्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाल्यापासून लहान मोठ्या अपघातानी हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे दृतगती महामार्ग हा गाजत आहे. अपघातांची ही मालिका चालू वर्षातही कायम आहे.शुक्रवारी, ४ एप्रिल रोजी सकाळी झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला. जखमीवर नजीकच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले.
१ एप्रिल पासून समृद्धी वरील टोल वाढविण्यात आला आहे. यातुलनेत उपलब्ध सोयी सुविधा कमीच आहे. दस्तूरखूद्ध नागपूर उच्च न्यायालयाने यावर वेळोवेळी नाराजी व्यक्त केली आहे. असाच प्रश्न महामार्ग नादुरुस्तीचा आहे. मध्यन्तरी दुसरबीड टोल नाक्यापासून कमिअधिक दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या पुलावरील लोखंडी अँगल उखडला होता. यामुळे त्याला धडकून किमान दहा वाहनाचे टायर फुटल्याची घटना काल परवा घडली होती. मात्र टोल नाक्यावर फोन करूनही मदत मिळाली नाही असा आरोप वाहन चालक, वाहन मालकांनी तेंव्हा केला होता. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या कारणांनी समृद्धी गाजतच राहते हे तेवढेच खरे..
या पार्श्वभूमीवर समृद्धी महामार्गावर दिवसेंदिवस अपघाताचे सत्र सुरूच असल्याचे चित्र आहे. आज,४ एप्रिलला सकाळी किनगाव राजा पोलीस ठाणे हद्दीत समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. प्रथम दर्शनी चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. एका भरधाव मालवाहू वाहनाने समोर उभ्या असलेल्या वाहनाला मागून धडक दिली. यात मालवाहू वाहनातील एक जण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाला.
जखमी रुग्णाला सिंदखेड राजा येथील शासकीय रुग्णालय मध्ये उपचारसाठी भरती करण्यात आले आहेत. येथे प्राप्त माहितीनुसार समृद्धी महामार्गाच्या नागपूर कॉरीडोरवर हा अपघात झाला. चिकू घेऊन जाणारे मालवाहू वाहन नागपूरकडे जात होते. यावेळी समोरील वाहनाला धडकून अपघात झाला. यात मालवाहू वाहनातील धनंजय गजानन तायडे याचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा सहकारी प्रथमेश हिम्मतराव लहुरकर (राहणार बार्शीटाकळी, जिल्हा अकोला ) हा गंभीर जखमी झाला आहे.समृद्धी महामार्ग रुग्णवाहिकेने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच किनगाव राजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.