नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा ग्रहण केली होती. बाबासाहेबांनी स्थापना केलेला समता सैनिक दल तेव्हापासून दीक्षाभूमीवर सुरक्षा आणि सेवेच्या कार्यात तैनात आहे. दीक्षाभूमीच्या मध्यवर्ती स्तुपाच्या सुरक्षेची जबाबदारी संपूर्णपणे समता सैनिक दलावर असते. यंदाही दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांच्या सुरक्षेसाठी समता सैनिक दल सज्ज झाला आहे.
समता सैनिक दलाचे दोन हजार सैनिक दीक्षाभूमीवर २४ तास तैनात राहणार आहेत. दीक्षाभूमीवर सुरक्षेसाठी २२ बिंदू तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक बिंदूवर चार सैनिक आणि एक अधिकारी तैनात राहणार आहे. पोलिसांच्या मदतीने समता सैनिक दल सेवा आणि सुरक्षा या भावनेतून दीक्षाभूमीवर २१ ते २५ ऑक्टोबरदरम्यान कार्य करणार आहे.
हेही वाचा – दीक्षाभूमीवर पुस्तकांचा मेळावा,कोट्यावधींची पुस्तक विक्री होणार
धम्मदीक्षेचा मुख्य सोहळा होणार असलेला मंच, दीक्षाभूमीचे प्रवेश द्वार येथेही समता सैनिक दल तैनात राहील. समता सैनिक दलाच्यावतीने चार महिला सैनिकांचे विशेष पथकही तयार करण्यात आले आहे. याशिवाय फिरते पथकही दीक्षाभूमी परिसरात राहणार आहे. समता सैनिक दलाच्यावतीने दहा गुप्तचर पथकही दीक्षाभूमीवर राहणार आहेत.