आर्थिकदृष्टय़ा कमकुवत असलेल्यांसमोर अनेक समस्या आहेत. त्यांना राजकीय पातळीवर न्याय मिळत नाही. त्यामुळे समाजातील काही सामाजिक संस्था पुढाकार घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करीत असतात. समाजाला आपण काही देणे लागतो या भावनेतून पर्यावरण, रक्तदान, वृक्षारोपण, शैक्षणिक आदी उपक्रम राबवून समाजाला जागृत करीत असतात. अशा सामाजिक संस्थांमध्ये मध्य नागपुरातील संवेदना परिवार संस्था गेल्या अनेक वर्षांपासून विविध समाजपयोगी उपक्रम राबवून समाजाला संवेदनशील करण्याचा प्रयत्न करीत आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जाणाऱ्या काही तरुण स्वयंसेवकांनी एकत्र येऊन काही समाजपयोगी उपक्रम हाती घेतले. समाजाला आपण काही देऊ शकतो या भावनेतून २००९ मध्ये संवेदना परिवार संस्थेची गुढीपाडव्याच्या दिवशी स्थापना झाली आणि बडकस चौकात पर्यावरण गुढी उभारून पर्यावरणाचा संदेश दिला. गोळवलकर गुरुजी, स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर या महापुरुषांच्या विचाराने प्रेरित होऊन संस्थेच्या सदस्यांनी विविध क्षेत्रात कामे सुरू केली आहेत.
विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती आणि परंपरा माहिती व्हावी यासाठी वेगवेगळ्या भारतीय सणाच्या दिवशी शाळांमध्ये उपक्रम राबविले जातात. विशेषत पर्यावरण क्षेत्रात विद्याथ्यार्ंचा सहभाग वाढावा यासाठी संस्थेच्या माध्यमातून कार्यक्रम केले जातात. अनाथ विद्याथ्यार्र्ना शाळेत गणवेश वाटप, आर्थिकदृष्टय़ा कमकुवत असलेल्या अपंग आणि मूकबधिर विद्यार्थ्यांचा शिक्षणाच्या खर्च संस्थेच्या माध्यमातून केला जातो. आतापर्यंत ४० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च संस्थेच्या माध्यमातून केला जात आहे. त्यांना शैक्षणिकदृष्टय़ा कुठल्याही गोष्टी कमी पडू नये, यासाठी संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात.
रेल्वे प्लॅटफॉर्म शाळेतील मुलांना दिवाळीच्या दिवसात फटाके, नवीन कपडे आणि खाद्य पदाथार्ंचे वाटप करण्यात आले होते. विवेकानंद जयंतीच्या दिवशी रेशीमबागेतील मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यासोबत त्यातील काही मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा खर्च संस्थेचे काही सदस्य करीत आहेत.
गेल्या काही वषार्ंत युवकांमध्ये सिगारेट, मद्य, गुटखा आदीचे व्यसन वाढत आहे. त्यामुळे अशा युवकांचे समुपदेशन करून त्यांना ही व्यसने किती वाईट आहेत, याची माहिती देण्यासाठी काही मागदर्शक तज्ज्ञांकडून समुपदेशन केले जाते. स्वामी विवेकानंद दिग्विजय दिनानिमित्त ‘से नो टू लिकर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी पर्यावरण, आरोग्य, शिक्षण यासह विविध सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्यांचा संवेदना गौरव पुरस्कार देऊन संस्थेच्यावतीने सत्कार केला जातो.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जीवनदर्शन या विषयावर मान्यवरांची व्याख्याने आयोजित करण्यात येतात. निवडणुकीच्या काळात जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी शहरातील विविध भागात जनजागृती अभियान राबविण्यात आले होते आणि त्याला प्रतिसाद चांगला मिळाला. गेल्या काही दिवसात प्लॅस्टीक बॅगचा उपयोग मोठय़ा प्रमाणात वाढला असून त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ‘से नो टू पॉलिथीन’ हा उपक्रम राबविण्यात आला. लोकांमध्ये जनजागती करण्यात आली. पर्यावरणाच्या दिवशी शहरातील विविध भागात वृक्षारोपण करण्यात आले असून १० हजार जवळपास वृक्ष लावले.
शासकीय रुग्णालयात रुग्णांना रक्त मिळावे म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्यासाठी हेडगेवार रक्तपेढीने सहकार्य केले. विविध उपक्रम राबवून एक सशक्त समाज निर्माण करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. त्यासाठी संस्थेचे निखिल गडकरी, निशांत अग्निहोत्री, रश्मी फडणवीस, सागर कोतवालीवाले, कुणाल नरसापूरकर, संदीप कीर्तने आदी पदाधिकारी काम करीत आहेत.