वर्धा : वर्धा लोकसभा क्षेत्रातील अमरावती जिल्हयात येत असलेल्या वरुड-मोर्शी मतदार संघातील मध्य रेल्वे नरखेड – अमरावती सेक्शनवरील चांदूर बाजार आणि मोर्शी रेल्वे स्थानकांदरम्यान तिर्थक्षेत्र रिद्धपूर येथे रेल्वे स्थानक सुरू करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाची (रेल्वे बोर्ड) व्दारा मंजुरी देण्यात आली आहे व या संदर्भातील लेखी आदेश रेल्वे बोर्डाकडून प्राप्त झाल्याची माहिती खासदार रामदास तडस यांनी दिली.
महानुभवपंथीयांची काशी म्हणुन संपुर्ण जगात प्रसिध्द असलेल्या व आध्यात्मिक क्षेत्रात जागृत तिर्थक्षेत्र समजल्या जाणा-या अमरावती जिल्ह्यातील तसेच वर्धा लोकसभा क्षेत्रा अंतर्गत येणा-या रिध्दपूर या गावी रेल्वे विभागातर्फे नविन प्रवासी रेल्वे स्थानक निर्माण व्हावे या करिता जनतेची व भाविक भक्ताची प्रवासी वर्गाच्या सोईकरिता अत्यंत जुनी अशी प्रलंबीत मागणी होती. २०२० ते २०२२ कोविड १९ महामारीमुळे सदर रेल्वे स्थानकाचा प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबीत होता. हा प्रस्ताव मान्य व्हावा म्हणुन वर्धा लोकसभा मतदार संघाचा खासदार या नात्याने माननीय रेल्वेमंत्री, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, रेल्वे बोर्डाचे चेअरमन, महाप्रबधंक मध्य रेल्वे व मंडळ रेल्वे प्रबधंक नागपूर विभाग यांच्या कडे विविध स्तरावर सतत पाठपुरावा केला, तसेच संसदेत सुध्दा हा प्रश्न उपस्थित केला होता.
हेही वाचा >>>फडणवीस गृहमंत्री असतानाही नोकरभरती घोटाळा, ‘आप’ ने केला सवाल
श्री. गोंविद प्रभु तिर्थस्थान सेवा समीती रिघ्दपुरचे अध्यक्ष महंत श्री. कारंजेकर महाराज उर्फ सन्मानीय मोहन दादा यांनी सदर विषयाचा अत्यंत अभ्यासपुर्ण असा पाठपुरावा केला तसेच संस्थेशी आस्था ठेवणा-या प्रत्येक मान्यवरांकडे हा विषय लावुन धरला. परीणामी या विषयाला आज यश प्राप्त झाले असल्याची प्रतिक्रिया खासदार रामदास तडस यांनी दिली.महाराष्ट्र शासनाच्या वतीने तिर्थक्षेत्र रिध्दपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच रिध्दपूर तिर्थक्षेत्र शासनाच्या ‘‘अ’’ वर्ग श्रेणीत येते व महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालय वर्धाचे अभ्यास केन्द्र या ठिकाणी कार्यान्वीत झाले असल्याने नविन रेल्वे स्थानकाचा भविष्यामध्ये फार मोठा उपयोग प्रवासी वर्गाला व भाविक भक्तांना होणार आहे.