नागपूर : विदर्भातील सर्वात मोठा वाळू माफिया गुड्डू ऊर्फ अमोल सेवाकर खोरगडे (३५, ग्रीन लॅव्हरेज कॉलनी, कोरडी) याच्यावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्धतेची कारवाई केली. नागपूर पोलिसांच्या इतिहासात पहिल्यांदाच वाळू माफियाला स्थानबद्ध करण्यात आले हे विशेष.
हेही वाचा >>> नागपूर : कर्जाचा डोंगर, धान्यविक्रेत्याची विष प्राशन करत केली आत्महत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुड्डू खोरगडे हा एका मोठ्या राजकीय नेत्यांचा ‘उजवा हात‘ म्हणून ओळखला जातो. त्याची विदर्भात वाळू तस्करांची साखळी आहे. तो या साखळीचा म्होरक्या असून त्याच्या परवानगीनंतरच शहरात वाळू पुरवठा करण्यात येत होता. कोट्यवधींची उलाढाल करणाऱ्या गुड्डू खोरगडेला राजकीय पाठबळ असल्यामुळे अनेकदा तो मोठमोठ्या नेत्यांच्या बंगल्यावर दिसत होता. खोरगडे याच्यावर खापरखेडा, खापा, सावनेर आणि नागपुरातील सदर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, अपप्रचार करणे, वाळूचा साठा करणे, वाळू काळ्या बाजारात विकणे, बनावट दस्तावेज तयार करणे, वाळूचा अवैधरित्या उपसा करणे आणि बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून देणे असे अनेक प्रकारचे गुन्हे खोरगडेवर आहेत. वाळूची अवैध वाहतूक, शासनाचा महसूल बुडवणे, अवैधरित्या वाळू गोळा करणे आणि विल्हेवाट लावणे अशा प्रकारात खोरगडे अव्वल होता. त्याच्या अवैध कृत्यावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची नजर होती. त्यामुळे त्याची माहिती गोळा करून गुन्हे दाखल करण्यात आले. त्याच्यावर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. त्याला सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले असून लवकरच त्याला कोल्हापूर कारागृहात पाठविण्यात येणार आहे.
हेही वाचा >>> नागपूर : ग्रामपंचायत निवडणुका, विदर्भातील २३३६ गावात आजपासून आचारसंहिता
काही राजकीय व्यक्तींचा हात?
कुख्यात गुन्हेगारांवर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्धतेची कारवाई करण्यात येते. परंतु, शहर पोलिसांच्या इतिहासात पहिल्यांदाच वाळू माफियावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली. त्यामुळे वाळू माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. वाळूच्या काळ्या धंद्यात काही राजकीय व्यक्तींचा हात असल्यामुळे पोलीस आयुक्तांच्या ‘रडारवर‘ काही नेतेसुद्धा आल्याची चर्चा आहे.