बुलढाणा : ‘सर्वांना स्वस्तात वाळू योजनेचा जिल्ह्यात फज्जा उडाल्याने रेती तस्करीला उधाण आले आहे. यामुळे माफियांचे मनोधैर्य टोकाला गेले असून देऊळगाव राजा तालुक्यातील एका खळबळजनक घटनेने तस्करांच्या दादागिरीवर शिक्कामोर्तब झाले आहे. या घटनेत सिंदखेडराजा उपविभागीय अधिकाऱ्यांच्या (एसडीओ) शासकीय वाहनाला तस्करांच्या वाहनाने मागून धडक दिली. यानंतर ‘ओव्हरटेक’ करून समोरच्या रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परला पळून जाण्यात मदत केली.

हेही वाचा >>> उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान…!

देऊळगाव राजा तालुक्यातील सुरा सरंबा या परिसरामध्ये अवैध रेतीचा उपसा व वाहतूक केली जात असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी समाधान गायकवाड यांना मिळाली. यानंतर गायकवाड, मंडळ अधिकारी व तलाठी कारवाईसाठी शासकीय वाहनाने जात असताना त्यांना सुरा-सरंबा मार्गावर विना क्रमांकाचे टिप्पर रेतीची वाहतूक करताना आढळले. या टिप्परचा पाठलाग करत असताना पाठीमागून वाळू माफियांच्या आलेल्या बोलेरो कारने  शासकीय वाहनाला धडक दिली. सुदैवाने शासकीय कर्मचारी बचावले. मात्र शासकीय वाहनाचे नुकसान झाले. टिप्परचा पाठलाग करत असताना या बोलेरो वाहनाने अडथळा निर्माण केला आणि अवैध रेती वाहतूक करणारे टिप्परला पळून जाण्यास मदत केली.  अंढेरा पोलीस ठाण्यात मंडळ अधिकारी रवींद्र घुगे यांनी घटनेची तक्रार दिली. याप्रकरणी स्वप्निल तळेकर, बळीराम मुंडे व अज्ञात दोघा अज्ञात आरोपींविरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, शासकीय अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला करणे आदि गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. आरोपी फरार असून त्यांचा शोध घेत असल्याची माहिती ठाणेदार विकास पाटील यांनी दिली.

Story img Loader