गडचिरोली : गेल्या दोन वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात महसूल विभागाच्या आशीर्वादाने वाळू तस्करी जोमात सुरू आहे. यामुळे त्रस्त आमदार डॉ. देवराव होळी यांनी स्वतः रात्री १२ वाजता नदी घाटावर जाऊन वाळू तस्करीवर छापा टाकला. यामुळे दुर्लक्ष करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांचा चेहरा उघडा पडला आहे. जिल्हाभरात रेती घाटांचे लिलाव झालेले नाही. त्यामुळे साठवणूक केलेली व नदी काठावरील शेतात पुरामुळे साचलेच्या वाळूची वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. परंतु वाळू तस्कर रात्रीच्या सुमारास कोणालाही न जुमानता नदी घाटावरून वाळूची वाहतूक करीत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील अहेरी, चामोर्शी, कुरखेडा, गडचिरोली व भामरागड उपविभागात मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरू आहे. यामुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत आहे. याविषयी तक्रार करूनही महसूल अधिकारी त्याकडे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष करीत असल्याने थेट आमदार डॉ. होळी यांनीच रात्री १२ वाजताच्या सुमारास चामोर्शी येथील वैनगंगा नदी पात्रात धडक देत तेथे सुरू असलेली अवैध वाळू तस्करी उघडकीस आणली. याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. सोबतच हा प्रकार बंद न झाल्यास आंदोलनाचा इशारादेखील त्यांनी दिला आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात वाळू तस्करीत काही नेतेदेखील गुंतले असल्याने प्रशासन कारवाईत कुचराई करीत असल्याचे चित्र आहे.