नागपूर : मध्यप्रदेशातील घाटावरून वाळू चोरी करून विनापरवानगी महाराष्ट्रात विक्री करणाऱ्या तब्बल २९ वाळू माफियांवर गुन्हे शाखेने कारवाई केली. वाहनांसह चार कोटींचा मुद्देमाल जप्त केला. या माफियाचा म्होरक्या हा मध्यप्रदेशातील राहुल खन्ना असून त्याचे मोठ्या राजकीय नेत्यांशी संबंध आहे.
हेही वाचा : पक्षाला संजय राऊतांसारखा उत्तम प्रवक्ता हवा आहे… आहे का कुणी?
मध्यप्रदेशातील घाटावरून विनारॉयल्टी वाळूची नागपूर जिल्ह्यात विक्री केली जाते. संतोष गायकवाड यांना बांधकामासाठी वाळूची गरज होती. राहुल नरेश खन्ना (भोपाळ-मध्यप्रदेश) या वाळू माफियाने राज्यात कुठेही वाळू पोहचवण्याची हमी दिली. त्याने लगेच ९, ९०० रुपये पाठवण्यास सांगितले. पैसे मिळताच राहुलने ट्रकचा क्रमांक आणि चालकाचे नाव मोबाईलवर पाठवले. काही तासातच वाळूचा ट्रक पोहचल्याने गायकवाड यांना संशय आला. त्यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना याबाबत माहिती दिली. विना रॉयल्टी आणि बनावट वाहतूक करण्याचा परवाना (ईटीपी) देऊन मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडवित असल्याचे समोर आले होते.
हेही वाचा : नक्षलवादी समर्थक प्रा. जी. एन साईबाबा व सहका-यांची निर्दोष मुक्तता
मॉईल कंपनीने त्यांच्या खाणींमध्ये लागणाऱ्या वाळू पुरवठ्यासाठी २०२१ मध्ये मेसर्स अलाईड कॉर्पोरेशन कंपनीला कंत्राट दिले होते. कंपनीने सदरे आलम (रा. कन्हान) याला हे काम दिले होते. आलमने काही साथिदारांसह मध्यप्रदेशातील शिवनी आणि बालाघाटमधील वाळू घाटावरून अवैधरित्या वाळू काढून कंपनीला वाळू पुरवठा केला. या कंपनीकडून कोट्यवधी रुपयांचे देयके उचलली. चोरीची वाळू आणून शासनाचा महसूलही बुडवला. याप्रकरणी मॉईलच्या तक्रारीवरून सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला व अलाईड कॉर्पोरेशन कंपनीचे मालक अनुराग चव्हाण (रा. धरमपेठ) याला अटक करण्यात आली.
हेही वाचा : ‘त्या’ २६३ आदिवासींच्या मृत्यूंची न्यायालयीन चौकशी करा ; जनहित याचिकेतून मागणी
वाळू चोरी आणि दोन राज्यांचा कोट्यवधीचा महसूल बुडवल्याच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हे शाखेकडून विशेष तपास पथक गठित केले. या पथकाने आतापर्यंत २२ ट्रक, टिप्पर, ८७२ बनावट वाहतूक परवाने (ईटीपी), ३२ मोबाईल आणि वाळू असा एकूण चार कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात नागपुरातील दोन बड्या राजकीय नेत्यांचा हात असल्याची चर्चा असून लवकरच सीबीआयसुद्धा चौकशी करण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.