अमरावती : आंतरराज्यीय चंदन चोर टोळीच्या म्होरक्यासह दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट एकने जेरबंद केले आहे. त्यांच्या अटकेने गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक गुन्हा उघडकीस आला. या टोळीतील तीन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा कसून शोध सुरू आहे.इसराईल खान इस्माईल खान गोलवाल (२४) रा. जंजाला, छत्रपती संभाजीनगर व झाकीर खान शेर खान (२८) रा. अचलपूर, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर शाहीद खान अली खान कालेसे, असलम खान उमर खान पठान व अन्य एक सर्व रा. जंजाला, छत्रपती संभाजीनगर अशी फरार आरोपींची नावे आहेत.
कांतानगर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या निवासस्थान परिसरातून २० हजार रुपये किमतीची चंदनाची दोन झाडे चोरून नेण्यात आली होती. या प्रकरणी शुभम विनोदराव गोलाईत (२८) रा. मच्छीसाथ, अमरावती यांनी २७ फेब्रुवारी रोजी गाडगेनगर ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास आरंभला. गुन्हे शाखेचे युनिट एकही या गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते. तपासात महाराष्ट्रसह इतर राज्यात चंदन चोरीचे गुन्हे करणारी टोळी ही छत्रपती संभाजीनगरमधील जंजाळा, घाटंब्री, नानेगाव आणि जालनामधील कठोरा बाजार येथील असल्याची माहिती समोर आली.
गुन्हे शाखेच्या युनिट एकने या भागात कसून चौकशी केली. त्यात सदर गुन्हा हा इसराईल खान याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने केल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकला मिळाली. या माहितीच्या आधारावर इसराईल खानचा शोध घेण्यात आला. दरम्यान, तो अंबाई येथील बाजारात आल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या युनिट एकने तेथून त्याच्या मुसक्या आवळल्या. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देऊन आपल्या साथीदारांची नावेही सांगितली. त्यानुसार झाकीर खानला अटक करण्यात आली.
झाकीर खानने इसराईल खानसह त्याच्या साथीदारांना रेकी करून चंदनाच्या झाडाबाबत माहिती दिल्याचे चौकशीत समोर आले. ही कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वात साहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश झोपाटे, सतीष देशमुख, फिरोज खान, सचिन बहाळे, अलीमोद्दीन खतीब, नाझीम सय्यद, विकास गुडदे, सचिन भोयर, सूरज चव्हाण, निखिल गेडाम, सायबरचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत कासार, निखिल माहोरे, सुषमा आठवले व अनिकेत वानखडे यांनी केली.