यवतमाळ : यवतमाळ विधानसभा मतदारसंघात यापूर्वीच्या दोन्ही निवडणुकीत काँग्रेस उमेदवार पराभूत झाले. त्यामुळे यावेळी येथील जागा महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून आपल्याला मिळेल, असा शब्द शरद पवार यांनी दिला होता. मात्र, काँग्रेसमधील काही नेत्यांनी षडयंत्र रचून आपल्याला उमेदवारीपासून वंचित ठेवले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी केला.
ते आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. महाविकास आघाडीत उमेदवारीसाठी आपण प्रयत्नशील होतो. नेते शरद पवार यांनी आपल्याला उमेदवारीचा शब्द दिल्याने मतदारसंघात गेल्या काही महिन्यांपासून प्रचारही सुरू केला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची उमेदवारी आपल्याला निश्चित झाली, हे कळल्यानंतर काँग्रेसमधील काही स्थानिक व बाहेरच्या नेत्यांनी षडयंत्र रचून आपणास उमेदवारी मिळू दिली नाही, असे बाजोरिया म्हणाले. काँग्रेसच्या एका माजी खासदाराने तिहार कारागृहात जावे लागू नये म्हणून भाजपशी हातमिळवणी केली असून, त्यांनीच आपल्या उमेदवारीला विरोध केला, असे ते म्हणाले. आपण उमेदवारी न मिळाल्यास महाविकास आघाडीचेचे काम करणार, असे बोललो होतो. आता ज्यांना उमेदवारी मिळाली ते बाळासाहेब मांगुळकर यांनाही मदत केली असती. पण, काँग्रेसचे मांगुळकर, महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख आदींनी आपल्याला महाविकास आघडीची तिकीट मिळाल्यास अपक्ष उमदेवारी दाखल करण्याचे मनसुबे आखले होते. त्यामुळे आता महाविकास आघाडीचे काम करणार नाही. आपण उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही. कोणाला पराभूत करण्यासाठी नव्हे तर जिंकून येण्यासाठी लढणार आहो. ‘तुतारी’ चिन्हावरच आपण ही निवडणूक लढवू, असे बाजोरिया म्हणाले.
हेही वाचा >>>ताडोबात ‘सीएम’चा रोड शो, अन् ताफा…
आपण यवतमाळच्या विद्यमान आमदारांच्या भोंगळ कारभाराविरोधात मोहीम उघडली. ‘गुन्हेगारी व भयमुक्त यवतमाळ’ अशी घोषणा दिली. आता सर्वच पक्षाचे उमेदवार, मी दिलेल्या घोषणा देत आहेत. ज्यांची सुरुवातच गुन्हेगारीतून झाली, अशा उमेदवारांचा प्रचार करताना काँग्रेसचे नेतेही गुन्हेगारी व भयमुक्त वातावरणाची ग्वाही देतात, हे आश्चर्यजनक असल्याची टीका बाजोरिया यांनी केली. बाजोरियांची उमेदवारी भाजपला पोषक असल्याचा प्रश्नावर आपला कौटुंबिक विरोधक भाजपच्या उमदेवारासोबत असताना, त्यांच्या मदतीसाठी निवडणूक कशी लढणार, असे बाजोरिया म्हणाले.
शरद पवारांवर भिस्त
संदीप बाजोरिया स्पष्ट व परखड बोलण्यासाठी प्रसिद्ध असल्याने महाविकास आघाडीत त्यांची मनधरणी करण्यासाठी कोणी पुढे येण्याची शक्यता नाही. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार हेच आता बाजोरिया यांची समजूत काढतील, या आशेवर महाविकास आघाडीतील अन्य नेते आहेत.