नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी हल्ला प्रकरणात नागपुरातून बुधवारी ताब्यात घेतलेला एसटीचा बडतर्फ कर्मचारी संदीप गोडबोले हा बहुजन अधिकारी- कर्मचारी संघटनेचा विभागीय अध्यक्ष असल्याचे पुढे येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई पोलिसांनी बुधवारी नागपूर गाठत  गोडबोले या कारागीर (क) पदावरील कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले होते. तो बहुजन अधिकारी- कर्मचारी संघटनेचा विभागीय अध्यक्ष असून तो संपात सहभागी होता. गोडबोले याने एलएलबीचे शिक्षण घेतले असून तो बऱ्याचदा मुंबईत अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना भेटला.  बऱ्याचदा त्याने सदावर्ते यांच्यासह न्यायालय परिसरातही हजेरी लावली होती. हल्ला झालेल्या घटनेच्या दिवशी गोडबोले हा सदावर्ते यांच्याशी व्हॉट्सअ‍ॅप कॉलवर काही वेळा बोलला. त्यामुळे मुंबई पोलिसांनी या घटनेचे तार नागपूरशी जुळले असल्याचा दावा केला होता. दरम्यान, गोडबोले हा एका संघटनेचा विभागीय अध्यक्ष असल्याचे पुढे आल्याने पोलिसांना त्याच्याकडून या आंदोलनाशी संबंधित काही माहिती मिळणार काय, याकडे सगळय़ांचे लक्ष लागले आहे.  गोडबोले हा वेळोवेळी संप काळात समाजमाध्यमांवर चलचित्र टाकत होता. गोडबोले हा संबंधित संघटनेत असल्याच्या वृत्ताला नागपूर विभाग नियंत्रक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी नाव न टाकण्याच्या अटीवर दुजोरा दिला आहे.

जलालखेडा परिसरातून ताब्यात

संदीप गोडबोले याला मुंबई पोलिसांनी प्रथम भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून बोलावले. परंतु तो टाळाटाळ करत चुकीचा पत्ता सांगत  होता.  संदीपकडून फारसा प्रतिसाद नसल्याचे बघत स्थानिक पोलिसांच्या मदतीने मुंबई पोलिसांनी त्याच्या भ्रमणध्वनीवरून तो कुठे आहे, याचा शोध घेतला. त्यानंतर लगेच जलालखेडा येथे जाऊन त्याला ताब्यात घेतले.