वर्धा : व्यवसाय पिढीजातच असतो, असे नव्हे हे दाखवून देणारे हे उदाहरण महिलांसाठी प्रेरणादायी ठरावे. खेडेगावात संसार आणि मग पतीच्या एक छोट्या नोकरी निमित्त परत खेडेवजा गावात सेलूत स्थलांतर. इथेच संगीता प्रवीण पुसदकर यांची कसोटी लागली. पतीची नोकरी करोना संकटात गेली. उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. दोन वेळच्या जेवणाची परीक्षाच लागलेली. अश्या वेळी करायचे काय म्हणून मग गावातील सिद्धेश्वर बचत गट मदतीस आला.त्यांनी दहा हजार रुपयाची मदत केली. त्यातून श्वेत मसाले नावाने व्यवसाय सूरू केला. याच गटाच्या माध्यमातूम जिल्हा परिषदेच्या उमेद अभियानाची माहिती संगीताताई यांना मिळाली.
उमेदमुळे मग मदत, मार्गदर्शन व मानसिक आधार मिळाला. परत मागे वळून पाहण्याची गरज पडली नाही. एक किरायाच्या छोटया खोलीत निवास व तिथेच हा मसाले व्यवसाय सूरू झाला.डोळ्यातील अश्रू एकदाचे थांबले. उमेद माध्यमातूम मग विक्रीचे स्टॉल लावण्यास संधी मिळाली. मसाले, मिरची, हळद कांडून त्याची विक्री सूरू केली. व्यवसायात पैसे कमी पडू लागले म्हणून स्टेट बँकेचे कर्ज उमेद माध्यमातून मिळाले. अडीच लाख रुपयात कांडप मशीन विकत घेतली. विक्री वाढली. पॅकेजिंग, पाउच मशीन व सोबतच ब्रँडिंगचे साहित्य विकत घेतले. लाखोची उलाढाल म्हणून मग संगीताताई लखपती दिदी म्हणून सन्मानित झाल्या. आता भाड्याचे घर अपुरे ठरू लागले. उदयोग पण वाढवायचा म्हणून जागा विकत घेत घर बांधले. कारखाना उभा केला. पतीचे सहकार्य मोलाचे पण त्यांनाच विक्री व अन्य कामाचा भार पडू लागल्याने इतर कामाचे हात आवश्यक ठरले. चार महिला सोबतीस घेतल्या आणि उत्पादन वेग वाढू लागला. खेड्यातील पडक्या घरातून ते सेलूच्या किरायाच्या खोलीतील पुसदकर परिवार दोन मजली घरात अवघ्या तीन वर्षात पोहचला.
आता या श्वेत मसाले उद्योगास एक वजन प्राप्त झाले होते. लहान गावात तसेच वर्धा शहरात मसाले श्वेतचेच आणा, असा पुकारा सूरू झाला.पुढील टप्पा पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेचा आला. त्याचा लाभ घेत मोठ्या मशिन्स आणल्या. कामे व विक्री पण वेगाने वाढत गेली. मसाल्याचा सुगंध दरवळत होताच. आता संगीताताई यांच्या व्यवसाय कौशल्य पण दरवळू लागले. ठिकठिकाणी त्यांचा सन्मान होवू लागला. पूणे येथील शासकीय समारंभात त्यांचा गौरव झाला. सासू सासरे सोबतच असतात. त्यांचा सांभाळ व एकुलत्या मुलाचे संगोपन ही जबाबदारी होतीच. आताही घरचे करूनच बाहेरची कामे पाहावी लागतात. पण आवडीचे काम म्हणून, कधी वीट आला नसल्याचे संगीताताई म्हणतात.
सोलापूर, नागपूर व अन्य ठिकाणी मसाले व मिरची पावडरची मागणी आहे. आता तर श्वेत मसाले उदयोगची एजन्सी देण्याची मागणी चंद्रपूर व नागपुरातून झाली आहे. सध्या जिल्ह्यात तालुका पातळीवार विक्रेते नेमले. व्यवसाय समृद्ध होत आहे. काही ऑनलाईन कंपन्यांनी पण ही उत्पादने ठेवायला सुरवात केली आहे. पण उंच उडत असतांना आपल्या मातीचे ऋण त्या विसरत नाही. स्थानिक शेतकऱ्यांकडूनच त्या धने, मिरची व वायगाव येथून हळद कांड विकत घेतात. उमेद, कृषी खाते, बँक यांचे ऋण कधीच विसरता येणार नसल्याचे संगीताताई आवर्जून सांगतात.