गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठातील नवनिर्मित सभागृहाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संस्थापक तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माजी अधिसभा सदस्य दत्ता डीडोळकर यांचे नाव देण्याच्या ठरवावरून पहिल्याच अधिसभेत सदस्यांमध्ये वादळी चर्चा झाली. शेवटी २२ विरुद्ध १२ अशा बहुमताने हा ठराव पारित करण्यात आला. त्यामुळे विद्यापीठात विशिष्ट विचारधारेचे विचार थोपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप काही सदस्यांनी केला आहे.
स्थापनेपासूनच विविध कारणांनी चर्चेत असलेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या पहिल्याच अधिसभेत संस्कृतिक सभागृहाच्या नावावरून वाद निर्माण झाला. बऱ्याच दिवसांपासून लांबलेली अधिसभा मंगळवारी पार पडली. कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या अधिसभेत विविध विषयांवर चर्चा झाली. काही महत्त्वाचे ठरावदेखील पारित करण्यात आले. मात्र, विद्यापीठातील नवनिर्मित सभागृहाला संघपरिवाराशी संबंधित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संस्थापक दत्ता डीडोळकर यांचे नाव देण्यासंदर्भात सदस्य गुरुदास कामडी यांनी प्रस्ताव मांडला. परंतु काही सदस्यांनी याला विरोध दर्शवला. या ठरावावर चर्चेदरम्यान अनेकांनी दत्ता डीडोळकर नेमके कोण, असा प्रश्न उपस्थिती केला.
नाव द्यायचेच असेल ज्या गोंडवाना प्रदेशाचे नाव विद्यापीठाला दिले त्या क्षेत्रातील आदिवासी क्रांतिकारक, विचारवंत यांचे नाव द्यायला हवे, असेही काहींनी सूचवले. मात्र, तसा ठराव नसल्यामुळे कुलगुरूंनी दत्ता डीडोळकरांच्या नावावर मतदान घेतले. यात २२ विरुद्ध १२ अशा बहुमताने अखेर हा ठराव पारित करण्यात आला. रात्री ९ वाजेपर्यंत चाललेल्या बैठकीत विविध विषयांवरदेखील चर्चा झाली.
हेही वाचा >>> हिंदूंना फसवणाऱ्यांचे समर्थन करणार का?, गृहमंत्री फडणवीसांना अंनिसचा थेट सवाल
विद्यापीठाचे कार्यक्षेत्र असलेल्या दोन जिल्ह्यात अनेक मोठे समजसेवक, शिक्षण महर्षी, आदिवासी क्रांतिकारक होऊन गेलेत. त्यांना दुर्लक्षित करून ज्यांना कुणीही ओळखत नाही आणि जे विशिष्ट विचारधारेच्या संघटनेशी जुळलेले होते, त्यांचे नाव विद्यापीठाच्या सभागृहाला देणे, हा चुकीचा पायंडा आहे. आमच्यापैकी अनेकांनी पहिल्यांदाच दत्ताजी डीडोळकरांचे नाव ऐकले, असे अधिसभा सदस्य अजय लोंढे म्हणाले.
तर, गोंडवाना विद्यापीठ उभारणीचा पाया दत्ताजी डीडोळकरांनी रचला होता. नागपूर विद्यापीठाच्या अधिसभेत उपकेंद्र गडचिरोली येथे सुरू करण्याबाबत त्यांनीच ठराव मांडला होता. त्यामुळेच हे विद्यापीठ आज उभे आहे. सोबतच शिक्षण क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान लक्षात घेता मी त्यांचा नावाचा प्रस्ताव मांडला व तो बहुमताने पारितदेखील झाला. त्यामुळे वादाचा विषयच येत नाही, असे स्पष्टीकरण अधिसभा सदस्य गुरुदास कामडी यांनी दिले आहे.