लोकसत्ता टीम

बुलढाणा : संग्रामपूर बाजार समितीच्या सभापती, उपसभापती पदासाठीची निवडणूक अविरोध झाली. सभापती पदी शिवसेना (शिंदे) चे शांताराम दाणे तर उप सभापतीपदी काँग्रेसचे सुरेश तायडे यांची अविरोध निवड झाली. निकाल जाहीर झाल्यावर महायुतीतर्फे विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला.

आज, रविवारी बाजार समितीत अध्यासी अधिकारी तथा सहायक निबंधक महेश कृपलानी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. युतीतर्फे दाणे व तायडे या दोघांचेच अर्ज सादर करण्यात आले तर आघाडीने अर्ज सादर करण्याचे टाळले. यामुळे निवड अविरोध झाल्याचे कृपलानी यांनी जाहीर केले.

आणखी वाचा-खासदार प्रफुल पटेल हे इकबाल मिर्चीचे ‘पार्टनर’, राष्ट्रवादीचे किरण अतकरी यांच्या वक्तव्याने खळबळ

आमदार संजय कुटे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या शेतकरी विकास पॅनेल ने संचालकांच्या एकूण १८ पैकी १२ जागा जिंकल्या होत्या. आघाडीला ६ जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे युतीने दोन्ही जागी अविरोध बाजी मारली. दरम्यान, भाजपकडे अनेक सक्षम उमेदवार होते. मात्र, भाजप आमदार संजय कुटे यांनी भावी राजकारण व विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन मित्र पक्षाला सभापती पद दिले. उपसभापती पद काँग्रेसला देऊन त्यांनी आघाडीला तडा दिला. यातच बाजार समितीची परिस्थिती बिकट असल्याने त्यांनी पाच वर्षांची डोकेदुखी भाजपपासून ‘सुरक्षित अंतर’वर ठेवल्याचे मानले जात आहे.

Story img Loader