|| महेश बोकडे
राज्यातील अनेक अनाथ मुलींना नि:शुल्क वाटप
सॅनिटरी नॅपकीनचा वापर वाढत आहे. आरोग्याच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट असली तरी त्यामुळे प्रदूषणाची नवीनच समस्या जन्माला आली आहे. हे प्रदूषण टाळण्यासाठी सीमा खंडाळे (परदेशी) यांनी एक ऋतू कपचे (मेन्स्टुअल कप) डिझाईन शोधून काढले आहे. विशेष म्हणजे, अशय सोशल ग्रुपने राज्यातील अनेक अनाथ मुलींना हे कप नि:शुल्क दिले आहेत.
नॅपकीन नष्ट करणे एक गंभीर समस्या झाली आहे. त्यातच काही महिला प्रवासात असताना वापरलेले सॅनिटरी नॅपकीन शौचालयात टाकतात. त्यामुळे मलवाहिनी चोख होण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर ऋतू कप हा चांगला पर्याय ठरत आहे. पर्यावरण संवर्धनासाठी ते वापरण्याबाबत अशय सोशल ग्रुपकडून राज्यात सर्वत्र जनजागृती केली जात आहे. या ग्रुपकडून नुकताच महानिर्मितीच्या कोराडी, खापरखेडा प्रकल्पातही एक कार्यक्रम घेण्यात आला. या कपचा उपयोग पाच ते दहा वर्षे करता येऊ शकतो. पोहणे, व्यायाम, योगासनेसह कोणतेही काम करताना या कपचा कोणताच अडथळा वाटत नाही. या कपमुळे कपडय़ांना डाग पडणे, वारंवार सॅनिटरी पॅड बदलावे लागणे, सार्वजनिक ठिकाणी वावरताना अवघडलेपण येणे अशा सगळ्या त्रासातून सुटका मिळते. याची स्वच्छता करणेही सोपे आहे. सुमारे पाच ते दहा मिनिट हे ऋतू कप उकळलेल्या पाण्यात ठेवल्यास ते पुन्हा वापरता येते.
वैद्यकीय कचऱ्याप्रमाणेच विल्हेवाट गरजेची
अशय सोशल ग्रुपच्या अभ्यासानुसार, एक महिला मासिक पाळीत १२ ते १५ सॅनिटरी नॅपकीन वापरते. वर्षांकाठी हा आकडा १५०च्याही पुढे जातो. महिलेच्या आयुष्यातील ४० ते ४५ वर्षांच्या मासिक पाळीचा कालावधी गृहीत धरल्यास सॅनिटरी नॅपकीनची संख्या ६,००० पर्यंत जाते. शहर, राज्य आणि देशातील महिलांची संख्या बघता या नॅपकीनमुळे होणारे प्रदूषण एक चिंतेचा विषय आहे. सॅनिटरी नॅपकीनमध्ये प्लास्टिकचा समावेश असल्यामुळे ते जमिनीत विघटित होत नाही. त्यामुळे त्याची वैद्यकीय कचऱ्याप्रमाणेच विल्हेवाट लावणे गरजेचे आहे, परंतु अशा पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची सोय राज्यातील सर्व भागात नाही.
‘‘ऋतू कप हे सिलिकॉन मटेरियलपासून बनवले आहे. ते योनी मार्गात सरकवल्यास घट्ट बसतात. ऋतू कप वापरताना महिलांना पोहणे, धावणे, योगासनेसह सर्वच कामे सहज करता येतात. हे कप वापरण्यास सोपे, आरोग्य, आर्थिक आणि पर्यावरणाच्या दृष्टीने फायदेशीर आहे. – सीमा खंडाळे (परदेशी), अशय सोशल ग्रुप.