कचऱ्यातील बॅक्टेरियामुळे पर्यावरणावर घातक परिणाम; इको फ्रेंडली लिविंग फाऊंडेशनच्या अभ्यासातील निष्कर्ष

महिलांसाठी मासिक पाळीच्या काळातील सुविधा म्हणून सॅनिटरी नॅपकिन्सकडे पाहिले जाते, पण त्याच्या योग्य विल्हेवाटी अभावी ते पर्यावरणासाठी घातक ठरत आहेत. उपराजधानीतून प्रत्येक महिन्याला जमा होणाऱ्या वापरलेल्या सॅनिटरी नॅपकिन्सच्या कचऱ्याचे प्रमाण सुमारे २४० टन इतके आहे. या कचऱ्यातील बॅक्टेरियामुळे पर्यावरणावर घातक परिणाम होत असल्याची माहिती इको फ्रेंडली लिविंग फाऊंडेशनच्या अभ्यासातून समोर आली आहे.

शहरात १३ ते ४५ वयोगटातील महिलांची संख्या सहा लाखांच्या जवळपास आहे. एका महिलेला महिन्याला आठ पॅड लागतात. त्यानुसार सुमारे ४८ लाख पॅड दर महिन्याला वापरले जातात. वापरण्यापूर्वी पॅडचे वजन २५ ग्रॅम असते, पण वापरल्यानंतर ते ५० ग्रॅम इतके होते. त्यामुळे हा कचरा सुमारे २४० टनापर्यंत जातो. सॅनिटरी नॅपकिन्समधील प्लास्टिक नष्ट व्हायला शेकडो वर्षे लागतात. कारण सहजासहजी त्याचे विघटन होत नाही. वापरलेल्या पॅडमध्ये अशुद्ध रक्त असल्याने त्यात बॅक्टेरिया तयार होतात. कचरा वेचणारे लोक ते हाताने वेगळे करतात आणि त्यातून त्यांना जंतूसंसर्ग किंवा त्वचेचे आजार होतात. घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ मधील कलम १७ नुसार, सॅनिटरी नॅपकिन्सच्या प्रत्येक पाकिटासोबत वापरलेले पॅड टाकण्यासाठी वेगळी लहान पाकिटे द्यावी लागतात. मात्र, हा नियम कुठेच पाळला जात नाही. वापरलेल्या सॅनिटरी नॅपकिन्सचा अविघटनशील कचरा पर्यावरणाला घातक ठरत असतानाही दुर्लक्षित केला जातो.

देशात दरवर्षी सुमारे ४० हजार कोटी वापरलेल्या पॅड्सचा कचरा गोळा होतो. वापरलेले सॅनिटरी नॅपकिन्स नष्ट करण्याकरिता ‘इन्सिनरेटर’ हा पर्याय असला तरीही त्यातून पर्यावरणाला दूषित करणारे वायू बाहेर पडतात. सद्यस्थितीत वापरलेले पॅड वर्तमानपत्र, प्लास्टिकमध्ये गुंडाळून कचरापेटीत किंवा बाहेर फेकण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यात जैविकदृष्टय़ा नष्ट होऊ न शकणाऱ्या क्रुड ऑईल, प्लास्टिक पॉलिमर्सला नष्ट होण्यासाठी शेकडो वर्षे लागतात. त्यावर पुनप्र्रक्रिया होत नसल्याने पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. नागपूर महापालिकेच्यावतीने सामाजिक संस्थांच्या सहकार्याने तीन वर्षांपूर्वी त्यासाठी एक प्रकल्प तयार करण्यात आला. मात्र, हा प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच बंद झाला. या प्रकल्पाअंतर्गत वापरलेले पॅड टाकण्यासाठी पिवळ्या रंगाचे डबे घरोघरी देण्यात येणार होते. खासगी संस्थेचे कार्यकर्ते आठवडय़ातून तीन दिवस हा कचरा संकलित करतील आणि त्यासाठी नाममात्र शुल्क आकारले जाईल, असेही ठरले होते.

पुणे महापालिकेने असा पर्याय शोधला..

वापरलेल्या सॅनिटरी नॅपकिन्सची विल्हेवाट लावण्याकरिता पुणे महापालिकेने गेल्या चार वर्षांत बारा प्रभागांमध्ये इन्सिनरेटर बसवले आहेत. दिवसाला दहा हजाराहून अधिक पॅडची विल्हेवाट लावण्यात येत आहे. या प्रकल्पाची जबाबदारी स्वयंसेवी संस्थांना दिली आहे. सध्या या प्रत्येक प्रकल्पात दिवसाला सुमारे ७५० ते ९०० सॅनिटरी पॅड जमा होतात. त्यासाठी कचरा वेचकांचे स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे. सासवड नगरपालिकेच्यावतीनेही घराघरातील सॅनिटरी नॅपकिन्सच्या शास्त्रोक्त संकलनासाठी प्रत्येक कचरा संकलन वाहनांवर हायजीन बॉक्सची व्यवस्था करण्यात आली आहे.

पुण्यात सुरू होण्यापूर्वी नागपुरातच हा प्रकल्प राबवण्यात येणार होता. काही ना काही कारणाने हा प्रकल्प पूर्ण करता आला नाही. आठवडाभरापूर्वीच आमची यासंदर्भात बैठक झाली. हा प्रकल्प पुन्हा नव्याने तयार करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात झोपडपट्टी, महिला वसतिगृहे अशा ठिकाणी हे वापरलेले पॅड जमा करण्यासाठी डबे देण्यात येणार आहेत. ते उचलण्याची जबाबदारी जैववैद्यकीय कचरा उचलणाऱ्या सुपर हायजिन कंपनीकडे सोपवण्यात आली आहे. वसतिगृहांमधून हा कचरा उचलण्यासाठी नाममात्र पैसे आकारले जातील.

– महेश कांबळे, आरोग्य अधिकारी, महापालिका

ज्या ज्या ठिकाणी आम्ही वेन्डिंग मशीन्स उपलब्ध करून देत आहोत, त्या त्या ठिकाणी इन्सिनरेटरसुद्धा उपलब्ध करून देत आहोत. प्रामुख्याने शाळांमध्ये ही सुविधा आम्ही उपलब्ध करून दिली आहे. आम्ही प्रत्येक सोसायटीपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यांच्याकडून इन्सिनरेटरची मागणी आली तर त्याठिकाणीसुद्धा आम्ही ते उपलब्ध करून देऊ. मुंबई शहरात आम्हाला अशाच एका सोसायटीतून इन्सिनरेटर लावण्याची मागणी आली आहे. आपल्याही शहरात तशी मागणी आली तर आम्ही ते नक्कीच लावून देऊ.

– गार्गी वैरागडे, संस्थापक, राईज फाऊंडेशन

Story img Loader