भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेब ठाकरे आणि बाबरी मशीदीसंदर्भात केलेल्या विधानावर बोलताना संजय राऊतांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. स्वतःला बाळासाहेबांचे वारसदार म्हणून मिरवता, तर मग बाळासाहेबांच्या अपमानानंतर तुम्ही शांत का? असा सवाल त्यांनी शिंदे गटाला विचारला होता. तसेच बाळासाहेबांचा अपमान करणारे तुमच्या मंत्रिमंडळात असतील, तर तुम्ही लाचार, लोचट आणि मिंधे आहात, असे ते म्हणाले होते. दरम्यान, या टीकेला शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. टीव्ही ९ वृत्तावाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले संजय गायकवाड?
बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या मातोश्रीवरून संपूर्ण देशाला हिंदुत्वाचे धडे दिले. त्याच मातोश्रीवर तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर बसून पार्ट्या करता, हिंमत असेल तर त्यांना लाथा मारून बाहेर काढून दाखवा. बाळासाहेबांनी त्यांच्या आयुष्यात कधीही काँग्रेस-राष्ट्रवादीशी मैत्री केली नाही. २०१२ मध्ये बाळासाहेब बोलले होते, ज्या दिवशी माझ्या मनात काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर मैत्री करण्याचा विचार येईल, तेव्हा मी माझ्या पक्ष बंद करेन. त्यांच्या या विधानाची थोडी तरी लाज वाटू द्या. त्यामुळे संजय राऊतांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये, असं प्रत्युत्तर संजय गायकवाड यांनी दिलं.
अरविंद सावंतांच्या टीकेवरही दिली प्रतिक्रिया
पुढे बोलताना त्यांनी ठाकरे गटाचे खासदर अरविंद सावंत यांनी केलेल्या टीकेवरही भाष्य केलं. शिंदे गटावर टीका करताना लांडग्याने वाघाचं कातडं घातलं, तर ते वाघ होत नाहीत, असं सावंत म्हणाले होते. यासंदर्भात बोलताना, महाराष्ट्रात खरे वाघ, कुत्रे, लांडगे कोण आहेत, हे सर्वांना माहिती आहे. आम्ही ३५ वर्ष वाघासारखे जगलो. मात्र, घरात बसणारे आणि ज्यांचा कधी शिवसेनेशी संबंध नव्हता, असेच लोक आता वाघाचं पांघरून घालून बसले आहेत, अशी प्रतिक्रिया संजय गायकवाड यांनी दिली.