यवतमाळ : दिल्लीतून राज्य मंत्रिमंडळातील पाच मंत्र्यांना वगळण्याच्या सूचना झाल्यानंतर धोक्यात आलेले संजय राठोड यांचे मंत्रिपद नंतरच्या घडामोडीत कायम राहिले. मात्र, त्यांच्याकडील महत्वाचे अन्न व औषध प्रशासन खाते काढण्यात येऊन त्यांना मृद व जलसंधारण खाते देण्यात आले. राठोड आज शुक्रवारी दिग्रसमध्ये नागरिकांच्या तक्रारी ऐकत असताना त्यांचे खाते काढण्यात आल्याची बातमी झळकली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अन्न व औषध खात्यातील तक्रारींच्या अनुषंगाने राठोड यांचे पद काढल्याच्या चर्चेने जोर धरला. एप्रिल महिन्यात ‘द महाराष्ट्र स्टेट केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स असोसिएशन’ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून अन्न व औषध प्रशासन खात्याची चौकशी करण्याची मागणी केली होती. या खात्यात ‘सुनावणी’च्या नावाखाली भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार खात्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नावानिशी झाल्याने खळबळ उडाली होती. संजय राठोड यांनी संघटनेचे आरोप फेटाळले होते. अन्न व औषध खात्याच्या कामकाजावर मुख्यमंत्रीही नाराज असल्याची चर्चा दरम्यानच्या काळात रंगली होती.

हेही वाचा >>> बुलढाणा : सामूहिक अत्याचारप्रकरणी पीडिता म्हणते अत्याचार झालाच नाही! लेखी जवाब चक्रावून टाकणारा…

याच दरम्यान दिल्लीतील भाजप श्रेष्ठींनी भाजपसाठी मारक ठरतील अशा शिवसेनेच्या पाच मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्याची सूचना केल्याच्या माहितीने खळबळ उडाली होती. या पाच मंत्र्यांमध्ये संजय राठोड यांचे  नाव असल्याचीही चर्चा होती. या सुचनेनंतर संजय राठोड अचानक दिल्लीत गेल्याने दिल्लीतील सूचनेत तथ्य असल्याचे सांगितले जात होते. या सर्व पार्श्वभूमीवर आज झालेल्या मंत्रिमंडळ फेरबदलात संजय राठोड यांच्याकडील महत्वाचे अन्न व औषध प्रशासन खाते काढून त्यांना मृद व जलसंधारण खाते देण्यात आले.

हेही वाचा >>> ‘समृद्धी’वरील बस अपघाताचे खाजगी संस्थेद्वारे ‘फायर ऑडिट’!

मंत्रिमंडळातील स्थान कायम राखण्यात संजय राठोड यांना यश आले तरी त्यांच्याकडील महत्वाचे खाते काढल्याने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचे महत्व कमी केल्याची चर्चा आहे. आजच्या फेरबदलाने संजय राठोड यांच्या समर्थकांमध्येही नाराजी व्यक्त होत आहे. संजय राठोड यांच्याकडील अन्न व औषध प्रशासन खाते विदर्भातीलच राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडे देण्यात आले.

देईल ती जबाबदारी पार पाडणार – संजय राठोड

आजच्या खाते फेरबदलाबाबत कोणतीही पूर्वकल्पना नव्हती. आम्ही सर्वजण मुख्यमंत्र्या नेतृत्वाखाली काम करतो. त्यामुळे ते देतील ती जबाबदारी स्वीकारू आणि यशस्वीपणे पार पाडू. कोणतेही खाते दुय्यम नसते. सर्वच खात्यात काम करण्यास वाव आहे. मृद व जलसंधारण खात्यातही उत्तम काम करू, असे मंत्री संजय राठोड यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay rathod food and drug administration portfolio removed and reduced in importance nrp 78 ysh
Show comments