वर्धा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः ज्याचे विधिवत पूजन करीत  ‘ मंदीर वही बनायेंगे ‘ ही घोषणा पूर्णत्वास नेली, त्या अयोध्या येथील राम मंदिराचे दर्शन घेण्यास अलोट गर्दी आज लोटत आहे. या सारखे हेच, असे उदगार रामभक्त काढतात. याच्या तोडीचे दुसरे नाहीच, अशी प्रशंसा होते. मात्र आता याच तोडीचे आमचे पण होणार, असा दावा झाला आहे. कारंजा तालुक्यातील बेल्हारा तांडा येथे संत सेवालाल मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जल संधारण मंत्री यांनी संजय राठोड यांनी भूमिका मांडली.

समाज बांधवांसाठी काय करणार याचे सुतोवाच त्यांनी केले. राठोड म्हणाले की पोहरा गड येथील नगारा भवनाच्या  माध्यमातून शैक्षणिक, आरोग्य, धार्मिक सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. या भवनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे बाराशे कोटी रुपयाची मागणी करण्यात आली आहे. या निधीतून जेव्हा नगारा भवन उभे होईल तेव्हा राम मंदिरानंतर नगारा भवनची गणना होईल, असा मी प्रयत्न करणार. तशी व्यवस्था होईल, अशी खात्री मंत्री संजय राठोड यांनी दिली. देशात १० कोटीवर बंजारा समाज आहे. या देशाचे राजकारण ते पालटू शकतात. समाजपुढे आरक्षण प्रश्न आहे. बोली, पेहराव, खानपान, रिवाज एकसारखे. मात्र कुठे अनुसूचित जातीत तर कुठे जमातीत. कुठे सर्वसाधारण तर महाराष्ट्रात व्हीजेएनटी.  ही विसंगती दूर करून सर्व बंजारा  समाजास एकाच कॅटेगिरीत आरक्षण मिळावे यासाठी माझे प्रयत्न सूरू आहे. मुख्यमंत्री दिवं. वसंतराव चव्हाण यांची उंची गाठने कुणासही  शक्य नाही. मात्र मात्र त्यांनी दाखविलेल्या  मार्गावर चालण्याचा प्रयत्न आहे, अशी ग्वाही राठोड यांनी दिली.

यावेळी बोलतांना माजी आमदार दादाराव केचे म्हणाले की माझ्या कारकिर्दीत मी प्रत्येक तांडा मुख्य रस्त्यासोबत जोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी राजगडचे महंत रायसिंग महाराज यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमचे सूत्र मनोज जाधव, विजय पवार व बजरंग पवार यांनी सांभाळले. सरिता गाखरे, संजय चव्हाण, शिवलाल जाधव, हनुमंत चरडे, ठाकरे सेनेचे दशरथ जाधव, शंकर राठी, साधना चौधरी, नीलेश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. आयोजनात रंगराव जाधव, चंदू जाधव, सरिचंद राठोड, विश्वनाथ राठोड, रेखाबाई जाधव, ज्योती राठोड, लिलेश्वर जाधव, चावळीबाई जाधव, मनोज जाधव यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

Story img Loader