नागपूर : माझ्या इच्छेचा प्रश्न येत नाही, महायुतीच्या नेत्यांनी यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून उमेदवारी दिली तर सर्वसामान्य लोकांचा मला पाठिंबा राहील, असे स्पष्ट संकेत देत महायुतीकडून ज्या नेत्यांचे नाव जाहीर केले जाईल तो उद्या अर्ज भरणार असल्याचे मत शिवसेनेचे नेते व राज्याचे मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केले. संजय देशमुख विरुद्ध संजय राठोड अशी लढत झाली तर सर्वसामान्य माणसांचा आशीर्वाद माझ्या पाठिशी राहील असेही राठोड म्हणाले.
मुंबईवरुन नागपूरला आल्यावर संजय राठोड प्रसार माध्यमांशी बोलत होते. यवतमाळच्या जागेबाबत कुठलाही तिढा नाही. मुख्यमंत्र्यांनी केवळ यवतमाळ- वाशिम मतदारसंघासाठी नाही तर हिंगोली आणि अन्य मतदारसंघाच्या प्रचाराच्या नियोजनाबाबत चर्चेसाठी बोलविले होते. जागा वाटपाबाबत बैठकी आणि चर्चा सुरू आहेत. राज्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करत आहे. त्यामुळे माझ्याकडे विदर्भाची जबाबदारी आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मला निवडणुकीत उभे राहण्याचे आदेश दिले तर त्यांच्या आदेशाचे पालन केले जाईल. मात्र ते दुसऱ्या उमेदवाराला उमेदवारी देऊ शकतात. याबाबतचा निर्णय महायुतीचे नेते योग्यवेळी घेतील आणि उद्या, गुरुवारला यवतमाळला महायुतीकडून अर्ज भरला जाईल असेही राठोड म्हणाले.
जागा वाटप जवळपास पूर्ण झाले असून सर्व चांगले उमेदवार दिले असून ते विजयी होतील असा विश्वास राठोड यांनी व्यक्त केला. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेचा विश्वास आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात ४०० पार जागा येतील आणि राज्यात ४५च्यावर जागा जिंकणार असल्याचे राठोड म्हणाले.