खारपाणपट्ट्यातील ६९ खेडी पाणीपुरवठा योजनेची मान्यता शिंदे-फडणवीस सरकारने रद्द केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी अकोला ते नागपूर पायी ‘संघर्ष यात्रा’ काढली आहे. काहीही झालं तरी खाऱ्या पाण्याचा टँकर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर उभा करणार असल्याचा इशारा नितीन देशमुख यांनी दिला होता. त्यातच आता नितीन देशमुखांना नागपूरच्या वेशीवर ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांनी नागपुरात येण्यापूर्वीच नितीन देशमुखांना ताब्यात घेतलं आहे. त्यावेळी पोलिसांनी देशमुखांना अक्षरश: फरफटत नेऊन गाडीत बसवलं. ताब्यात घेतल्यानंतर नितीन देशमुखांना पाण्याचा टँकर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर नेऊन उभा करणार असल्याचा इशारा दिला आहे.
हेही वाचा : “आमच्याकडे गुजरातची पावडर”, संजय गायकवाडांच्या वक्तव्यावर नाना पटोलेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…
नितीन देशमुखांना ताब्यात घेतल्यावर शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत सरकारवर टीकास्र सोडलं आहे. “पाणी प्रश्नावर अकोला ते नागपूर यात्रा काढणाऱ्या आमदार नितीन देशमुखांना अटक झाली. नागपूरच्या हद्दीबाहेर पोलिसांनी त्यांना रोखले. खारघर येथे श्रीसेवक पाण्याशिवाय तडफडून मारले. आता विदर्भात पाणी आक्रोश केल्याने अटका केल्या. महाराष्ट्रात जणू मोगलाई अवतरली आहे. सरकार जनतेलाच घाबरु लागले!,” अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
नेमकं काय प्रकरण?
महाविकास आघाडी सरकार असताना खारपाणपट्ट्यात येणाऱ्या बाळापूर तालुक्यातील ६९ गावांना गोड्या पाण्याचा पुरवठा होण्यासाठी पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली होती. त्याचे कामही सुरू झाले होते. त्यासाठी वान धरणातील पाणी ६९ गावांच्या पाणी पुरवठा योजनेसाठी आरक्षित करण्यात आलं. पण, याला तेल्हारा तालुक्यातील नागरिकांसह शेतकऱ्यांनी विरोध केला. त्यानंतर स्थानिक भाजपा लोकप्रतिनिधींनी ही योजना रद्द करण्यासाठी पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रह धरला.
हेही वाचा : पिक्चर अभी बाकी है? अजित पवारांच्या नाराजीवर गुलाबराव पाटलांचं सूचक विधान, म्हणाले…
फडणवीसांनीही या पाणी पुरवठा योजना रद्द केली. यावरून आता नितीन देशमुखांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. शिंदे- फडणवीस सरकारने ही बंदी उठवावी, अशी मागणी करत नितीन देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांच्या घराबाहेर आंदोलन करणार असल्याचं सांगितलं होतं. पण, नितीन देशमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.