मुंबई महापालिकेतील शिवसेना कार्यालय ताब्यात घेण्यावरून शिंदे गट आणि शिवसेनेत ( ठाकरे गट ) बुधवारी जोरदार राडा झाला. महापालिकेतील शिवसेना कार्यालयात कोणीच नसल्याचं पाहून शिंदे गटाचे खासदार, माजी नगरसेवक दाखल झाले. याची माहिती मिळताच शिवसेनेचे शिवसैनिकही दाखल झाले. यावेळी एकमेकांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावरून खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“शिंदे गटाचे पदाधिकारी घुसखोरच आहेत. स्वत:च अस्तित्व नसून, सगळीकडे घुसखोरी करण्यात येत आहे. ही झुंडशाही आणि मस्तवालपणा हा सत्ता असल्यामुळे आहे. सत्तेशिवाय समोरासमोर या मग दाखवतो. गद्दारांची जगभरात एक पद्धत आहे, ते कुठेही घुसतात. महापालिकेत शिवसेनेचं पूर्ण बहुमत असून, पक्ष एकत्र आहे,” असं संजय राऊतांनी सांगितलं.

हेही वाचा : “साहेब सध्याचे मुख्यमंत्री…”; जाहीर कार्यक्रमात पुणेकराने शिंदेंचा केलेला तो उल्लेख ऐकून राज ठाकरेंनीच कपाळाला हात लावला

“महापालिकेतील सर्व पक्षाच्या कार्यालयाला सील करण्यात आलं आहे. कोणत्या कायद्याने सील लावलं गेलं? नोटीस दिली का? ही मनमानी आहे. पक्षाच्या कार्यालयात टाळ ठोकण्यात आलं, हे कोणच्या आदेशाने सुरु आहे. याला कायद्याचं राज्य म्हणत नाही. तुम्ही ठोकशाहीने राज्य करणार असाल. तर, ठोकशाहीच्या राज्यात शिवसेनेचं प्रगस्तीपुस्तक चांगल्या मार्काचं आहे. ठोकशाहीत कोणी स्पर्धा करू नका. पालिकेतील कार्यालय शिवसेनेचं राहणार आहे. आयुक्त आणि राज्याचे मुख्यमंत्री काही सुत्र हालवत असतील तर सावध पावले टाकवीत,” असा इशारा संजय राऊतांनी दिला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut criticized shinde group over bmc shivsena office handover shinde group ssa