महाविकास आघाडीची महत्वाची सभा नागपुरात होत आहे. नागपूर हा भाजपाचा गड समजला जातो, या पुढच्या गोष्टी आहेत. असे अनेक गढ तुटून पडतात. आम्ही कोणाचं वाईट चिंतत नाही. पण, लोकांनी ठरवल्यावर गड कसे सांभाळणार. महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा होऊ नये, यासाठी सरकारने आणि काही लोकांनी अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ तुम्ही मानत असलेल्या गडाच्या पोटात भीतीचा गोळा आला आहे, असा टोला खासदार संजय राऊत यांनी भाजपाला लगावला आहे.
संजय राऊत नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. भारत हे हिंदू राष्ट्र आहे आणि राहीन, असं ट्विट महाराष्ट्र भाजपाने केलं आहे. याबद्दल विचारल्यावर संजय राऊत म्हणाले, “कोणी म्हटलं हे हिंदुचं राष्ट्र नाही. बाळासाहेब ठाकरे, वीर सावरकर यांनी हे हिंदुचं राष्ट्र असल्याचं सांगितलं आहे. पण, याचा अर्थ असा नाही की फक्त राजकारणासाठी हिंदुत्वाचा वापर करावा. हिंदुत्वाच्या अनेक विचारांवर नागपुरातच चिंतन कराव लागेल,” असा टोमणा संजय राऊतांनी भाजपाला लगावला आहे.
हेही वाचा : “बंटी पाटील ९६ कुळी पाटील नव्हे, तर…”, धनंजय महाडिकांची घणाघाती टीका
“राहुल गांधी हे ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरेंना भेटण्यास जातील, याची माहिती माझ्याकडं नाही. पण, राहुल गांधी देशातील सर्व प्रमुख विरोधी पक्षातील नेत्यांना भेटत आहेत. या देशात २०२४ पर्यंत संपूर्ण विरोधी पक्ष एका झेंड्याखाली किंवा एका छताखाली एकवटले पाहिजे. एकास एक उमेदवार आम्ही दिला, तर भाजपाला दीडशेचा आकडही पार करता येणार नाही,” असं संजय राऊतांनी सांगितले.
भाजपाचे सर्व नेते तुमचा सकाळचा भोंगा बंद झाला पाहिजे, अशी टीका करतात. याप्रश्नावर संजय राऊत म्हणाले, “ये डर होना चाहिये… ये डर है… आमची भीती असायला पाहिजे. माझ्या भीतीने हे लोक झोपत नाही, मला माहिती आहे.”