मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक ( आरएसएस ) डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन त्यांना वंदन केलं. तसेच, आरएसएसचे दुसरे संघचालक माधवराव गोळवरकर यांच्या स्मृतींनाही मुख्यमंत्री शिंदेंनी अभिवादन केलं. यावेळी त्यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार प्रसाद लाड उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “हे एक प्रेरणास्थान आणि स्फूर्तीस्थान आहे. बालपणी संघाच्या शाखेत गेलो होतो. रेशीमाबगेत आल्यावर समाधान वाटलं. यामध्ये कोणताही राजकीय हेतू नाही. शिवसेना आणि भाजपा एकत्र आहेत,” असे एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.

हेही वाचा : BMC मध्ये शिंदे विरुद्ध ठाकरे : “सत्तेशिवाय समोरासमोर या मग…”; संजय राऊतांचं शिंदे गटाला थेट आव्हान!

मुख्यमंत्री शिंदेंच्या रेशीमबागेतील भेटीवरून शिवसेना खासदार संजय राऊतांनी खोचक टोला लगावला आहे. “संघ विचारांचा रेशमी किडा त्यांच्या कानात आणि मनात पहिल्यापासून वळवळत आहे. रेशीमबागेत जाणं चुकीचं नाही आहे. आरएसएस ही हिंदुत्ववादी विचारांची संघटना आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्र जात असतील तर आनंद आहे,” असं संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा : “त्यांच्या हातात काहीही आलं, तरी ते…”, अजित पवारांची गिरीश महाजनांना कोपरखळी; ‘त्या’ कृतीमुळे सभागृहात हशा!

“मुख्यमंत्री काही दिवसांनी सभागृहात खाकी पॅन्ट आणि काळी टोपी घालून येतील. कारण, आरएसएस ही राष्ट्रीय बाण्याची संघटना आहे. आम्ही त्यांच्यावर कधीही टीका केली नाही. पण, पक्षांतर झालं आहे, इतक्या लवकर रक्तांतर होईल, असं वाटलं नव्हतं,” असेही संजय राऊतांनी म्हटलं आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut taunt eknath shinde over visit rss smriti mandir nagpur ssa