नागपूर: अतिशय गजबजलेल्या चौकात संजुबा माध्यमिक शाळा असल्यामुळे विद्यार्थिनी आणि पालकांची मोठी कसरत सुरू आहे. शाळा सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेला वाहतुकीची कोंडी व पालकांची गर्दी होत असल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. भविष्यात त्या चौकात एखादी अनुचित घटना घडण्याची वाट वाहतूक पोलीस बघत आहेत का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चक्रधरनगरात व्यंकटेश सभागृहाच्या बाजूला संजुबा माध्यमिक शाळा आहे. या शाळेत जवळपास हजारांवर विद्यार्थिनी शिक्षण घेतात. या शाळेचे प्रवेशद्वार चक्रधरनगर चौकाच्या अगदी १० फूट अंतरावर आहे. ते आकाराने खूपच लहान असल्यामुळे विद्यार्थ्यांची गर्दी प्रवेशद्वारासमोरच होते. त्यात शाळेच्याच रस्त्यावर दत्तात्रयनगर उद्यान किंवा सक्करदरा तलाव असल्याने वाहनांची वर्दळसुद्धा असते. रस्त्यावरील वाहने, शाळेत मुलांना सोडण्यासाठी आलेले पालक व सायकलने आलेल्या विद्यार्थिनींची शाळेसमोर गर्दी होते.  शाळा सुटल्यानंतर संपूर्ण चौक विद्यार्थिनी आणि पालकांच्या वाहनांनी गजबजलेला असतो. त्या रस्त्यावरून वाट काढण्यास वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. प्रवेशद्वाराजवळ शिक्षक व सुरक्षारक्षक उपस्थित असतात. मात्र, विद्यार्थिनींची संख्या बरीच मोठी असल्यामुळे ते पुरेसे नाही. त्यामुळे भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून वाहतूक पोलिसांनी या चौकातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढणे गरजेचे आहे.

हेही वाचा >>> गडकरींची कबुली, विदर्भात पाचशे-हजार कोटी गुंतवणूक करणारे सापडत नाही …

सभागृह-उद्यानामुळे गर्दी

ताजबाग परिसरात सभागृह व उद्यानांची संख्या जास्त आहे.   शाळेच्या बाजूला व्यंकटेश सभागृह आहे. शाळेच्या काही अंतरावर दत्तात्रयनगर उद्यान व सक्करदरा तलाव आहे. त्यामुळे या परिसरात ये-जा करणाऱ्या नागरिकांची वर्दळ असते.

खाद्यपदार्थांची दुकाने पदपथावर

शाळेच्या रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्रेत्यांची जवळपास ४० वर दुकाने आहेत. सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात खवय्ये या परिसरात येतात.

प्रवेशव्दार अरूंद

शाळा प्रशासनाने प्रवेशद्वार मोठे केल्यास चौकातील कोंडीवर तोडगा निघू शकतो. तसेच पालकांनीही अगदी शाळेच्या प्रवेशद्वारापर्यंत वाहने नेता कामा नये. वाहतूक पोलिसांनीहीसुद्धा या भागात गस्त घातल्यास विद्यार्थ्यांना सोयीचे ठरेल, असे लक्ष्मण बालपांडे (वाहनचालक) म्हणाले.

पोलीस तैनात करण्याचे आश्वासन

चौकात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून नव्याने उपाययोजना आखण्यात येतील. दोन वाहतूक पोलीस कर्मचारी वर्दळीच्या रस्त्यावर गस्त घालण्यासाठी तैनात करण्यात येईल, असे  भारत कऱ्हाडे (पोलीस निरीक्षक, सक्करदरा वाहतूक शाखा) म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjuba secondary school students risk of accident due to traffic jam nagpur adk 83 amy