लोकसत्ता टीम

यवतमाळ : केंद्र सरकारने केलेल्या कामांची माहिती देण्यासाठी गावात आलेल्या संकल्प रथयात्रेला गावकऱ्यांनी परतवून लावले. मारेगाव तालुक्यातील पिसगाव येथे शनिवारी हा प्रकार घडला. ही रथयात्रा भारत सरकारची की मोदी सरकारची, असा प्रश्न उपस्थित करीत ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला.

जिल्ह्यात दररोज शेतकरी, शेतमजूर आत्महत्या करीत आहेत. अद्याप शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई मिळाली नाही. शेतमालाला हमीभाव नाही. बेरोजगारी, महागाईने जनता त्रस्त आहे. तरीही शासन सर्वत्र आनंदीआनंद असल्याचे भासवत ‘मोदी सरकार’ असे अंकित केलेला संकल्प रथ गावागावत फिरवत आहे. सरकारच्या विकासकामांची माहिती रथाच्या माध्यमातून जनतेला देण्याचा संकल्प सरकारने केला आहे. शनिवारी हा रथ पिसगाव व किन्हाळा येथे दाखल होताच नागरिकांनी संकल्परथ आणणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. नागरिकांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देऊ न शकल्याने अधिकाऱ्यांनी गावातून रथ परत घेऊन जाणे पसंत केले.

आणखी वाचा-शेताच्या कुंपणात वीज प्रवाह… दोन महिलांचा जागीच मृत्यू

ग्रामस्थांनी संकल्प रथयात्रा परतवून लावल्याने सत्ताधारी पक्षाचे धाबे दणाणले आहे. पिसगांव येथील शेतकरी मारोती गौरकार यांनी पुढाकार घेत रथ आणणाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार करीत, ही यात्रा भारत सरकारची की मोदी सरकारची आहे? असा प्रश्न उपस्थित केला. यावर अधिकाऱ्यांनी मौन पाळत कुठल्याही प्रश्नाचे उत्तर न देता रथ परत घेऊन जाणे पसंत केले. जनतेला खोट्या विकासाचा आढावा व न झालेल्या कामांची माहिती संकल्प रथ यात्रेच्या माध्यमातून देत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.

Story img Loader