नागपूर : महानिर्मिती कंपनीतील कर्मचाऱ्यांची संक्रांत गोड झाली आहे. कंपनीने जानेवारीपासून आपल्या कर्मचाऱ्यांना ४ टक्के वाढीव महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासकीय कर्मचारी व इतर सर्व पात्र पूर्णकालिन कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता १० जानेवारी २०२३ च्या आदेशान्वये ३४ टक्यांवरून ३८ टक्के करण्यात आला होता. ही चार टक्के वाढ १ जुलै २०२२ पासून लागू केली गेली.
हेही वाचा >>> नागपूर: एमपीएससीचा नवीन अभ्यासक्रम, एनएसयुआयचे आंदोलन कशासाठी?
दरम्यान शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाच्या आधारे तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या पुनर्रचित महानिर्मिती कंपन्यांच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनाही सुधारित दराने महागाई भत्ता मंजूर करण्यात येतो. दरम्यान संक्रांतीच्या तोंडावर महानिर्मितीने पूर्णकालीन अधिकारी- कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा आदेश काढला आहे. आदेशानुसा, महागाई भत्त्याचे वाढीव दर जुलै- २०२२ पासून लागू राहणार आहेत. त्यामुळे जानेवारी- २०२३ च्या वेतनात अधिकारी- कर्मचाऱ्यांना या महागाई भत्याची थकबाकीही मिळणार आहे. या वृत्ताला महानिर्मितीच्या जनसंपर्क विभागाने दुजोरा दिला आहे.