नागपूर : आपल्या समाजातील उच्चनीचतेची भावना, अस्पृश्यता, जातीयवाद समूळ नष्ट व्हायला हवा. माणूस हा जातीने मोठा नाही तर गुणांनी मोठा होतो. हिंदुत्व, हिंदू धर्म आणि हिंदू जीवनपद्धतीचा संबंध पूजापद्धतीशी फार कमी आहे. परंतु, मधल्या काळात जातीयवाद आणि उच्चनीचतेच्या कल्पनांमुळे आपल्या जीवनपद्धतीबद्दल, हिंदुत्वाबद्दलचे गैरसमज समाजात पसरले आणि त्यातून विरोधक तयार झाले. पण संस्कृत आणि हिंदुत्व हे सर्वसमावेश असून ते सर्व लोकांपर्यंत पोहचायला हवे, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. कवी कुलगुरू संस्कृत विश्वविद्यालयाचे हे रजत महोत्सवी वर्ष असून यानिमित्त साई सभागृहात झालेल्या एका विशेष कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना गडकरी बोलत होते.

हेही वाचा : साईबाबा प्रकरणात कुणाचे चुकले? काय चुकले?

यावेळी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे, प्रो. श्रीनिवास वरखेडी, विद्यमान प्रभारी कुलगुरू प्रो. मधुसूदन पेन्ना उपस्थित होते. यावेळी गडकरींनी संस्कृत विद्यापीठाच्या स्थापनेच्या इतिहासाला उजाळा दिला. गडकरी म्हणाले, संस्कृत ही ब्राम्हणांची भाषा आहे आणि त्यामुळे हे विद्यापीठ स्थापन करण्याची गरज नाही, असे म्हणून स्थापनेला विधिमंडळातील काही नेत्यांनी जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकर नाईक यांनी श्रीकांत जिचकार यांची समिती तयार करून विद्यापीठ स्थापनचे कार्य पूर्णत्वास नेले. आज संस्कृतबद्दलचे गैरसमज दूर करून ती सर्वसमावेश करून सामान्य माणसापर्यंत पोहचणे आवश्यक आहे. आपली संस्कृती, इतिहासाचे अध्ययन करायचे असेल तर सर्व संदर्भग्रंथ हे संस्कृतमध्ये उपलब्ध आहेत.

हेही वाचा : माझ्या ‘त्या’ वाक्याचा चुकीचा अर्थ काढल्यामुळे गैरसमज; रामदास आठवले

मात्र, दुर्दैवाने मधल्या काळात या ग्रंथांचे लोकांसमोर सादरीकरण करण्यामध्ये आपण कमी पडलो. त्यामुळे संस्कृत विद्यापीठाने या दिशेने काम करून संस्कृतचा प्रचार करावा असे आवाहन गडकरींनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही समायोचित मार्गदर्शन केले. कुलगुरू पेन्ना यांनी संस्कृत विद्यापीठाच्या अनेक उपक्रमांची माहिती दिली.

हेही वाचा : नागपूर : दुष्काळ जाहीर न झाल्यास दिवाळीत आंदोलन; नाना पटोले

संस्कृत सर्वसमावेश असून ज्ञानाचा भंडार आहे. संस्कृत ही कुठल्याही एका जातीची मक्तेदारी नाही. संस्कृत ही भारतीयांची भाषा आहे. संस्कृतमध्ये असलेल्या विज्ञानासह इतर महत्त्वाच्या बाबींचे भाषांतर करणे आवश्यक आहे. संस्कृतचा संबंध संस्कृतीशी आहे. त्यामुळे भारतीय संस्कृती आणि संस्कृतचा समन्वय साधून जगामध्ये याचे सादरीकरण करणे आवश्यक आहे असेही गडकरी म्हणाले.

Story img Loader