संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अधिसभेची (सिनेट) उद्या १० जानेवारी रोजी आयोजित बैठक स्थगित करण्यात आली आहे. सिनेटमधून व्यवस्थापन परिषद व विद्या परिषदेवर (ॲकेडमिक कौन्सिल) पाठवावयाच्या सदस्यांच्या निवडीसाठी ही विशेष बैठक बोलावण्यात आली होती. बैठक स्थगित करण्याचा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप ‘नुटा’चे अध्यक्ष डॉ. प्रवीण रघुवंशी यांनी केला आहे.सिनेटवरील राज्यपालनामित दहा सदस्यांची निवड घोषित न झाल्याने ही सभा रद्द करण्याची परवानगी विद्यापीठ प्रशासनाने मागितली होती. मात्र, विद्यापीठाच्या या पत्राला उत्तर मिळाले नव्हते, त्यामुळे या बैठकीबाबतची अनिश्चितता कायम होती. बैठकीच्या चोवीस तास आधी ती स्थगित करण्यात आल्याचा संदेश धडकल्याने सिनेट सदस्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
हेही वाचा >>>अमरावती: शिव ठाकरेने जेव्हा जत्रेत नारळही विकले….; कुटुंबीयांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा
अमरावती विद्यापीठाच्या सिनेटची निवडणूक गेल्या २० नोव्हेंबर रोजी पार पडली. परंतु गेल्या अडीच महिन्यात सिनेटची एकही बैठक आयोजित केली गेली नाही. त्यामुळे सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या ‘नुटा’ संघटनेने बैठकीच्या आयोजनाबाबत विद्यापीठाला पत्र लिहले होते. त्यानुसारच्या घडामोडींमुळे येत्या १० फेब्रुवारी रोजी बैठक निश्चित करण्यात आली होती. परंतु दुसऱ्यांदा निश्चित करण्यात आलेली ही बैठकही बारगळली आहे. सिनेटमधून व्यवस्थापन परिषद व विद्या परिषदेवरील सदस्यांच्या निवडीसाठी १० फेब्रुवारीची विशेष बैठक बोलावण्यात आली होती. परंतु सिनेटवरील राज्यपाल नामित सदस्यच अद्याप ठरले नसल्याने सध्याच्या सिनेटला पूर्णत्व प्राप्त झाले नाही. अशा स्थितीत निवडणूक घेणे म्हणजे अद्याप घोषित न झालेल्या सदस्यांचा अधिकार डावलण्यासारखे होईल, असे विद्यापीठ प्रशासनाचे म्हणणे होते. त्यामुळेच विद्यापीठ प्रशासनाने राज्यपालांकडे बैठक रद्द करण्याची परवानगी मागितली होती, तर शिक्षण मंचनेही हीच मागणी केली होती.
हेही वाचा >>>वर्धा: शरद पवारांच्या दौऱ्यावरून वाद; माजी खासदार म्हणतात दौरा यशस्वी होईल, तर…
सिनेटमधून व्यवस्थापन परिषदेवर निवडून द्यावयाच्या आठ जागांपैकी तीन जागांवर ‘नुटा’ ने बिनविरोध विजय मिळवला आहे. उर्वरित जागांचा निर्णय १० फेब्रुवारीच्या सिनेट बैठकीत होणार होता. राज्यपालांनी या बैठकीच्या आयोजनाची परवानगही दिली होती. पण, ही बैठक स्थगित झाल्याने ही प्रक्रियाच आता थांबली आहे.
नियमबाह्य कृती
अशा पद्धतीने बैठक स्थगित करण्याची तरतूद कायद्यात नाही. हा प्रकार राजकीय हेतूने प्रेरित असून निवडणुकांच्या सभा स्थगित करणे ही नियमबाह्य आहे. सुमारे २० दिवसांपुर्वी बैठकीच्या आयोजनाविषयी कळविण्यात आले होते. आता ऐनवेळी बैठक स्थगित करण्याचे औचित्य नाही. -डॉ. प्रवीण रघुवंशी, अध्यक्ष, ‘नुटा’.