तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला छेद देण्याचा प्रयत्न

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सर्व लोकांना समोर ठेवून ग्रामगीता रचली. मात्र, यातील शब्दांची मोडतोड, चुकीचा अनुवाद करून यातून राष्ट्रसंतांच्या प्रतिमेला छेद देण्याचा प्रयत्न होत आहे. शिवाजीराव पंढरीनाथ कृदत्त यांनी केलेला हिंदी अनुवादही चुकीचा असल्याने राष्ट्रसंतांचे अनुयायी संतापले आहेत.

तुकारामदादा गीताचार्य यांच्या प्रयत्नातून उर्दू, गुजराती, इंग्रजी, हिंदी भाषेतील ग्रामगीतेचा अनुवाद आणि प्रकाशन झाले. मात्र, आता भाषेचा शास्त्रशुद्ध अभ्यास नसणारे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेचे अनुवाद करीत आहेत. चार वर्षांपूर्वी ‘पद्मगीता’ नावाने ग्रामगीतेच्या ओव्यांना तोडून मोडून छापण्यात आले होते, तर काही दिवसांपूर्वी गायत्री परिवाराच्यावतीने लहान मुलांसाठी प्रकाशित पुस्तकातून असाच प्रकार समोर आला होता. माफीनाम्यानंतर हे प्रकरण संपले, पण आता पुन्हा एकदा ग्रामगीतेच्या मोडतोडीचा प्रकार समोर आला आहे. ‘ग्राम गीता हिंदी अनुवाद’ अशा नावाने शिवाजी पंढरीनाथ कृदत्त यांनी ग्रामगीतेचा हिंदी अनुवाद समोर आणला आहे. तर सृजन प्रकाशन अमळनेरने हा अनुवाद प्रकाशित केला आहे. या अनुवादाने राष्ट्रसंतांच्या नावापासून तर त्यांच्या चित्रापर्यंत घोळ घातला आहे. अनुवादाच्या मुखपृष्ठावर आणि छायाचित्राखाली ‘वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज’ असे तुटक शब्द अंकित आहे.

राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेत ४१ अध्याय आहेत. त्या प्रत्येक अध्यायावर स्वत: राष्ट्रसंतांनी नागपुरातील जागतिक कीर्तीचे चित्रकार डी. के. मनोहर यांच्याकडून ४१ महापुरुषांचे चित्र काढून घेतले आहे. मात्र, या हिंदी अनुवादित ग्रामगीतेत मूळ चित्र न टाकता अनुवादकाने त्याच्या कल्पनेतील महापुरुषांचे फोटो टाकले.

श्री गुरुदेव युवा मंचचे प्रवर्तक ज्ञानेश्वर रक्षक पंढरपूरला गेले असता त्यांना एका दुकानात या अनुवादित ग्रामगीता आढळल्या. राष्ट्रसंतांचे साहित्य चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर आल्यामुळे त्यांचे मूळ साहित्य डागाळले गेले आहे. त्यातून हिंदी भाषिक अभ्यासकांमध्ये चुकीचा संदेश जाऊन तुकडोजी महाराजांचा ग्रामगीता ग्रंथ साहित्य आणि प्रबोधनाच्या दृष्टीने कूचकामी असल्याची भावना अभ्यासकांमध्ये आणि नागरिकांमध्ये निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत श्री गुरुदेव युवा मंचाने मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार केली आहे.

मूळ ग्रामगीतेचे चुकीचे विविध हिंदी अनुवाद, अभ्यासकात संभ्रम निर्माण करण्याचे षडयंत्र आहे. ग्रामगीतेची विटंबना थांबवावी. हा निंदनीय प्रकार असून तो पुन्हा कुणी करू नये. राज्याच्या सांस्कृतिक मंत्रालयाने याची दखल घ्यावी या चुकीच्या ग्रंथाच्या प्रती जप्त करून त्या नष्ट कराव्या आणि लेखकावर कायदेशीर कारवाई करावी.        – ज्ञानेश्वर रक्षक, श्री गुरुदेव युवा मंच