संजय मोहिते
बुलढाणा : महाराष्ट्र राज्याला संत आणि वारकरी परंपरेचा उज्ज्वल वारसा लाभला आहे. या गौरवशाली परंपरेचा मान राखण्यासाठी व संतांचा वैचारिक वारसा पुढील पिढी पर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यात संत विद्यापीठाची स्थापना करण्याची महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केली.
इसरूळ (ता. चिखली) येथे आज हजारो भाविकांच्या उपस्थितीत संत चोखोबाराय मंदिराचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर रोहयो मंत्री संदिपान भुमरे, खासदार प्रतापराव जाधव, आमदार किरण सरनाईक, वसंत खंडेलवाल, नारायण कुचे, संजय रायमुलकर, संजय गायकवाड, श्वेता महाले, गोपिकिसन बाजोरीया, हरिभाऊ बागडे, विजय जगताप, हभप पुरूषोत्तम महाराज, पाटणकर महाराज आदीसह हजारो भाविक उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, संत साहित्याचा अभ्यास आणि चिकित्सा होणे काळाची गरज आहे. अभंग, भारूडाचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी संत विद्यापीठ उपयुक्त ठरेल, असा आशावाद त्यांनी बोलून दाखविला. संत परंपरा भक्ती, सहनशक्ती, संयम, विवेक आदी गुणांची प्रेरणा देते. महाराष्ट्र संतांची भूमी आहे. समाजप्रबोधन तसेच लोकांचे जीवन प्रकाशमान करण्याचे काम संत विचारांनी केले आहे. आध्यात्मिक परंपरेचे स्थान राजकीय व इतर क्षेत्राहून वरचे आहे. हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर स्व. आनंद दिघे यांचेही वारकरी संप्रदायावर खूप प्रेम होते, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.