अकोला : बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी अजितदादा पवार यांची नियुक्ती झाली. अजितदादांनी सर्वप्रथम आमच्यासह देशमुख समाजाला न्याय देण्याचे कार्य करावे, अशी अपेक्षा संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज येथे व्यक्त केली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करून सर्व दोषींना कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी आज अकोल्यात आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात देशमुख कुटुंबीय सहभागी होते.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. या प्रकरणात न्यायासाठी देशमुख कुटुंबीय रस्त्यावर उतरले आहे. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यात यावे. सरकारला जे काही करता येईल, ते करून कुटुंबासह समाजाला न्याय मिळावा, अशी आमची मागणी आहे. तपासासाठी सरकारने राबवलेल्या यंत्रणेने गांभीर्यान कार्य करावे. या हत्याकांडातील शेवटच्या आरोपीला शिक्षा होईपर्यंत सरकार शांत राहणार नाही, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिला आहे, असे धनंजय देशमुख म्हणाले. बीड जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचा पवित्रा घेतला. पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून देखील प्रथम न्यायाची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. ‘माझ्या वडिलांना न्याय मिळेल, तेव्हा समाधान लाभेल. संपूर्ण राज्याची न्यायाची मागणी आहे,’ असे संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिने म्हटले.
हेही वाचा >>>कठोर पोलीसही हळहळले…‘लुसी’ला अखेरची सलामी देताना…
दरम्यान, संतोष देशमुख यांची हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाच्या निषेधार्थ शहरातील अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी हातात फलक घेऊन नागरिकांनी रोष व्यक्त केला. दोन्ही प्रकरणांमध्ये न्याय मिळाला, आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी आदी मागण्या आक्रोश मोर्चात करण्यात आल्या आहेत. सर्वधर्मीय, सर्वपक्षीय व सर्व सामाजिक संघटनांनी जनआक्रोश मोर्चा काढला होता. या मोर्चात संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, मुलगी वैभवी आणि मुलगा विराज आदींसह विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी, सामाजिक संस्था, संघटनांचे पदाधिकारी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. यावेळी विवेक देशमुख यांच्यावतीने स्व.संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना ५० हजाराची आर्थिक मदत देण्यात आली.
ॲड. प्रकाश आंबेडकरांची भेट
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात देशमुख कुटुंबीयांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची अकोल्यात भेट घेतली. ॲड. आंबेडकर यांनी प्रकरणासंदर्भात देशमुख कुटुंबाशी चर्चा केली.