नागपूर: बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणात भाजपचाच हात आहे का? असा सवाल करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली होती. या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही आता प्रत्युत्तर देत हा शुद्ध वेडेपणा आहे ,अशी प्रतिक्रिया दिली आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगेंची धार कमी करण्यासाठी भाजप आमदार सुरेश धसांना पुढे केलं जातंय. धसांनीच संतोष देशमुख प्रकरणात आंदोलन उभं केलंय. आकाचे ‘आका ‘ शब्द आम्ही आणले नाहीत. किंबहुना धस यांनी देशमुख कुटुबीयांच्या अश्रुचा बाजार केलाय, त्यामुळे संतोष देशमुख प्रकरणात भाजपचा हात आहे का? ,अशी शंका उपस्थित करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. यावर उत्तर देताना चंद्रशेखर बावनकुळेंनीही पलटवार करत उत्तर दिले आहे.
संजय राऊतांचे वक्तव्य म्हणजे शुद्ध वेडेपणा आहे. संतोष देशमुखाच्या मारेकरीला फाशी व्हावी म्हणून चौकशी सुरू आहे. भडकवण्याच काम त्यांनी करू नये. देशमुख हत्या ही गंभीर बाब आहे. याकडे राजकारण म्हणून बघू नये, सरकारच्या चौकशीला सगळ्यांनी साथ द्यावी. आरोपीला फाशी झाली पाहिजे. असे आवाहन ही चंद्रशेखर बावनकुळेंनी यावेळी केले आहे. तसेच सुरेश धस संदर्भात वारंवार प्रश्न विचारून राजकारण करू नका, असेही ते म्हणाले.
आम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही, भाजपची ती पद्धतीही नाही
नागरिक आपले प्रश्न घेऊन येत असतात. आमचे महायुतीचे आणि भाजपचे मंत्री, संपर्क मंत्री त्या त्या जिल्ह्यात जाऊन जनतेच्या अपेक्षा जाणून त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. आम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही, भाजपची ही पद्धती नाही. विकसित महाराष्ट्राचा संकल्प आम्ही घेतलाय. त्या पद्धतीने महाराष्ट्र पुढे नेणार आहे. या संकल्पनेला साथ देण्यासाठी अनेक लोक पक्ष प्रवेश करतात. आमच्या पक्षात या असं कधीही कोणाला म्हणत नाही. जनतेला वाटते भाजपमध्ये गेलं पाहिजे. आम्ही त्या लोकांचं स्वागत करतो. असे म्हणत यवतमाळचे शिवसेनेचे खासदार संजय देशमुख यांनी केलेल्या दबावतंत्राच्या दाव्यावर बावनकुळेंनी उत्तर दिले आहे.
निवडणुकांच्या अनुषंगाने आपापल्या पक्षाची चाचपणी केली पाहिजे
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकेच्या अनुषंगाने महायुतीतील तिन्ही पक्षांनी आपापल्या पक्षाची चाचपणी केली पाहिजे. आमची महायुती अत्यंत मजबूत आहे. आपापला पक्ष वाढवून इतर स्पेस घेणे हे आमचं काम आहे. एक कोटी ५० लाख प्राथमिक सदस्य नोंदणी करत आहे. तीन लाख लोकांना सक्रिय सदस्य करत आहे. आम्ही महायुती विधानसभा लढली, लोकसभेत लढली. पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्था महायुती लढण्याचा विचारात आहे, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.