चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ऑनलाइन प्रणालीवर सायबर हल्ला करून ३ कोटी ७१ लाखांची रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. त्यातील एक काेटी ३२ लाखांची रक्कम परत मिळवण्यात बँकेला यश आले आहे. उर्वरित दोन कोटी नऊ लाखांची रक्कम परत मिळवण्यासाठी बँकेने ॲड. लिमये यांची ‘फॉरेन्सिक ऑडिट’साठी नेमणूक केली आहे. ही रक्कम परत मिळवण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जात आहेत. मात्र, विरोधकांकडून बँकेबाबत अफवा पसरवली जात आहे, असा आरोप बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी भाजप नेते तथा माजी मंत्री सुधीर मुनंटीवार यांचे नाव न घेता केला.
आमदार मुनगंटीवार यांनी जिल्हा बँकेतील भ्रष्टाचार, नोकरभरती प्रकरण विधानसभेत लावून धरले. यावर, गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी ‘एसआयटी’ चाैकशीची घोषणा केली. याबाबत रावत यांनी प्रतिक्रिया दिली. बँकेचे विरोधक वैयक्तिक आकसापोटी व स्वार्थासाठी बँकेची बदनामी करीत आहेत. वेगवेगळ्या अफवा पसरवून बँकेला वेठीस धरण्याचा आणि स्वत:ची पोळी भाजण्याचा प्रयत्न ते करीत आहेत, असा आरोप रावत यांनी केला. सायबर चोरट्यांकडून परत मिळवलेली रक्कम बँकेने ग्राहकांच्या खात्यात जमा केली आहे. बँकेचे ठेवीदार, हितचिंतक यांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, बँक सदैव ग्राहकांच्या पाठिशी आहे. उर्वरित रक्कम परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांचा सायबर विभागही तपास करीत आहे, असेही त्यांनी सांगितले.
बँकेची आर्थिक स्थिती उत्तम
बँकेची आर्थिक स्थिती उत्तम असून ठेवी व कर्जवाटपामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. कर्जवसुलीचे प्रमाण आणि नफाही वाढलेला आहे. ‘एनपीए’ नियंत्रित आहे. १५ वर्षांपासून बँकेच्या संलग्न संस्थांना न मिळालेला लाभांष ४ वर्षांपासून दिला जात आहे. राज्यातील उत्कृष्ठ जिल्हा सहकारी बँकांमध्ये आपली बँक प्रथम पाच क्रमांकामध्ये आहे, असा दावाही रावत यांनी केला.