नागपूर: नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाळू व सडक्या सुपारीची तस्करी होत असल्याचे वारंवार प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ), पोलीसांसह अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कारवाईतून पुढे येते. दरम्यान सावनेरचे भाजप आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी शुक्रवारी रात्री नागपूर जिल्ह्यातील केळवद परिसरात वाळू व सुपारी तस्करांच्या गाड्यांवर छापा टाकला. त्यात आढळलेल्या गोष्टीतून धक्कादायक माहिती पुढे आली.
भाजपचे सावनेरचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांना मध्य प्रदेशातून सावळी मार्गाने सातत्याने वाळू, सडक्या सुपारी, तंबाखूसह इतरही अनेक प्रतिबंधित वस्तूंची अवैध वाहतूक सातत्याने होत असल्याची तक्रार मिळाली. त्यावरून डॉ. देशमुख यांनी काही कार्यकर्त्यांसोबत मिळून शुक्रवारी (३ जानेवारी) रात्रीला अचानक या मार्गावरील केळवद परिसरात संशयास्पदरित्या जाणारे ट्रक अडवले. या वाहनांची झडती घेतली असता त्यात वाळू, सडक्या सुपारीसह इतरही अनेक संशयास्पद गोष्टी आढळल्या. तातडीने पोलीस, अन्न व औषध प्रशासन विभागाला याबाबत सूचित केले गेले. त्यानंतर या विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून कारवाई केली.
सावनेरचे भाजप आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी शुक्रवारी रात्री नागपूर जिल्ह्यातील केळवद परिसरात वाळू व सुपारी तस्करांच्या गाड्यांवर छापा टाकला. त्यात आढळलेल्या गोष्टीतून धक्कादायक माहिती पुढे आली. pic.twitter.com/ba9yN53mDy
— LoksattaLive (@LoksattaLive) January 4, 2025
हेही वाचा – चंद्रपूर : क्रौर्याची परिसीमा… क्षुल्लक कारणावरून अल्पवयीन मुलाची दगडाने ठेचून हत्या
दरम्यान याप्रसंगी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना डॉ. आशिष देशमुख म्हणाले, मध्यप्रदेशमधून सावळी मार्गाने अवैध वाहतूक सातत्याने सुरू आहे. रॉयल्टी वाचवणे, ओव्हरलोड ट्रक चालवणे, टोल वाचवणे अशी अवैधरित्या कामे या सगळ्या कृत्यातून होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्तेसुद्धा खड्डेयुक्त झाले आहे. या अवैध कृत्यामुळे येथे अपघात वाढून स्थानिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. या टोळ्यांचे कृत्य पुढे आणण्यासाठी हा छापा मारला. या टोळ्यांची सगळी माहिती पुढे आणावी म्हणून पोलिसांना सूचना केली आहे. ज्या पद्धतीने येथून सडक्या सुपारीची वाहतूक होत आहे. ती खाऊन सर्वसामान्य नागरिकांचेही जीव धोक्यात येत आहे. सोबत राज्यात तंबाखू, गुटखासह पानमसाला प्रतिबंधित आहे. या वस्तूंचीही या मार्गाने तस्करीचीही शंका आहे. त्यामुळे पोलिसांसोबतच अन्न व औषध प्रशासन विभागालाही या प्रकरणात सखोल चौकशी करण्याची सूचना केल्याचेही डॉ. देशमुख यांनी सांगितले. हे कृत्य पुढे चालू देणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा – चंद्रपूर : सावधान…! पैनगंगा खाण परिसरात वाघाचा मुक्त संचार; परिसरात दहशत
आमदारच तपासणीसाठी ट्रकवर चढतात तेव्हा…
केळवद परिसरात अवैध वाळू व सुपारी तस्करी करणाऱ्या ओव्हरलोड ट्रकला शुक्रवारी रात्री अडवल्यावर ट्रकमधील साहित्याची पाहणी करण्यासाठी आमदार डॉ. आशिष देशमुख स्वत:च ट्रकवर चढले. त्यांनी एका पोत्याला हात लावून बघितले. परंतु अंदाज येत नव्हता. त्यानंतर त्यांनी पोत्याला थोडासा चिरा दिला. त्यानंतर पोत्यातून सडकी सुपारी बाहेर पडली. त्यानंतर येथील आमदारांसोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.