Saoner Vidhan Sabha Election 2024 : २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत काटोल मतदारसंघात सुनील केदार यांच्याऐवजी त्यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी देण्यात आली आहे. सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार या काँग्रेसकडून निवडणुकीला उभ्या आहेत. या मतदारसंघात भाजपाने आपला उमेदवार उभा केला आहे. भाजपाकडून आशिष देशमुख यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. येथे काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट लढत होणार आहे.
सुनील छत्रपाल केदार हे सावनेर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. लोक प्रतिनिधीबरोबरच केदार हे व्यापारी आणि शेतकरीदेखील आहेत. १९९५ आणि २००४ साली असे दोनवेळा ते अपक्ष म्हणून सावनेर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते. मात्र २००९, २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ते सावनेर मतदारसंघातून काँग्रेसपक्षातर्फे विधानसभेवर निवडून गेले. सावनेर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी विविध खात्यांचे मंत्रीपद भूषविले आहे.
हेही वाचा – History of exit polls: भारतातील मतदानोत्तर चाचण्यांची (एग्झिट पोल) सुरुवात कधी झाली?
पाचवेळा सावनेर मंतदारसंघातून निवडून आले
सुनील केदार पाचवेळा सावनेर मंतदारसंघातून निवडून आले आहेत. केदार यांची नागपुरातील ग्रामीण भागातील राजकारणावर चांगली पकड असल्याचे बोलले जाते. मात्र, २५ वर्षे जुन्या नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी दोषी आढळल्याने नागपूर उच्च न्यायालयाने सुनील केदार यांना ५ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. यानंतर २४ डिसेंबर २०२३ रोजी सुनील केदार यांना महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून अपात्र ठरवण्यात आले असून केदार यांना सहा वर्षे निवडणूक लढवता येणार नाही.
सुनील केदार यांच्या पत्नीला उमेदवारी
सावनेर हा केदार यांचा बालेकिल्ला आहे. मात्र आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत केदार यांना पर्यायी उमेदवारी देण्याचे आव्हान काँग्रेससमोर होते. केदार यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी मिळेल का? याबाबतही उत्सुकता होती. काँग्रेसने सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार यांना निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहे. आशिष देशमुख हे सुनील केदार यांचे विरोधक मानले जातात. देशमुख हे १९९५ आणि २००९ साली असे दोन वेळा सुनील केदार यांच्या विरोधात सावनेर येथून विधानसभा निवडणुकीला उभे राहिले होते. मात्र केदार यांनी देशमुख यांना पराभूत केले होते. यंदा भाजपकडून आशिष देशमुख यांना सावनेर मतदारसंघातून संधी देण्यात आली आहे. अनुजा केदार आणि आशिष देशमुख यांच्यात लढत होणार असून त्यांच्यापैकी कोण निवडून येईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सावनेरला ऐतिहासिक महत्त्व
सावनेर हे नागपूर जिल्ह्यातील एक शहर आणि तालुका असून ते कोलार नदीकाठी वसलेले आहे. हे शहर नागपूरपासून सुमारे ३६ किलोमीटर अंतरावर आहे. सावनेर ऐतिहासिक आणि पौराणिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. नदीकाठी असलेले हेमाडपंती शिव मंदिर हे नागरिकांसाठी श्रद्धेचे ठिकाण आहे. १९४२ च्या ब्रिटिशांविरुद्धच्या भारत छोडो आंदोलनातील भूमिकेमुळेही सावनेरला ऐतिहासिक महत्त्व आहे. सावनेर हा रामटेक लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.