नागपूर : केशवनगरातील सरस्वती शिशू मंदिर शाळेच्या समोरील रस्त्यावर नेहमी मोठ्या वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे शाळेतील विद्यार्थी भरधाव वाहनांच्या भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत. याकडे शाळा प्रशासन आणि वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे.
रेशीमबाग मैदानाकडे जाताना केशवद्वारातून समोर गेल्यावर सरस्वती शिशू मंदिर ही इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. ही शाळा अगदी रस्त्याच्या कडेला असल्यामुळे विद्यार्थी प्रवेशद्वाराजवळ गोळा झाल्यानंतर त्यांना शाळेसमोरील रस्त्यावर भरधाव वाहनांचा कायम धोका असतो. या शाळेची सुरक्षा भिंत रस्त्याच्या लगत असून विद्यार्थ्यांसाठी अडचणीची ठरत आहे.
शाळेत नर्सरी ते सातव्या वर्गापर्यंतचे विद्यार्थी आहेत. पूर्व प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची सकाळी शाळा असून दुपारी १२ वाजता शाळा सुटते. तर पहिली ते सातव्या वर्गाचे विद्यार्थी १२.३० वाजता शाळेत येतात. त्यामुळे पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळेचे विद्यार्थी एकाच वेळी शाळेसमोर गोळा होतात. त्यातही या शाळेसमोर दुचाकी किंवा स्कूलव्हॅन उभी करायला जागा नाही. त्यामुळे शाळेचे विद्यार्थी कायम सुसाट वाहनांच्या भीतीच्या सावटाखाली दिसतात. यामुळे शाळेत पाल्यांना सोडणाऱ्या पालकांचा जीव नेहमी टांगणीला असतो. पाल्यांना थेट शाळेच्या प्रवेशद्वाराच्या आत सोडूनच पालक घराकडे परत जातात.
शाळेसमोर विद्यार्थी-पालकांची गर्दी
सकाळ आणि दुपार अशा दोन पाळ्यांमध्ये सुरू असलेल्या या शाळेत पाल्यांना सोडणारे पालक आणि शाळेतून पाल्यांना घेण्यासाठी आलेल्या पालकांची शाळेसमोर एकच गर्दी होते. त्यामुळे या गर्दीमुळे जवळपास अर्धा रस्ता व्यापला जातो. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होते.
वाहतूक कोंडी
शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्कूलबसची सुविधा नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी ऑटोने शाळेत येतात. शाळा भरण्याच्या वेळेस ऑटो रस्त्यावर उभे राहतात. तसेच शाळेच्या संरक्षक भिंतीजवळ ऑटो उभे करीत असल्यामुळे सुद्धा बराच रस्ता व्यापला जाऊन वाहतूक कोंडी होते.
शाळा सुटण्याच्या वेळेवर शाळा प्रशासनाने एक कर्मचारी रस्त्यावर ठेवून मुलांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्यासाठी मदत करावी. तसेच पालकांनीही पाल्यांना शाळेत सोडताना वाहने रस्त्याच्या कडेला लावावी. जेणेकरून ही समस्या सुटेल. -उमेश भोगे (वाहनचालक)
शाळेच्या विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण निर्माण व्हावे, यासाठी वाहतूक पोलिसांची गस्त वाढवण्यात येईल. तसेच भरधाव येणाऱ्या वाहनांवरही नियंत्रण ठेवून कारवाई करण्यात येईल. -भरत कऱ्हाडे, (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा)