लोकसत्ता टीम
चंद्रपूर : दत्तक गावांवर खर्च होणारा सामाजिक दायित्व निधी इतरत्र वगळून वाटेल त्या पध्दतीने खर्च केल्याचा आरोप करित कोरपना तालुक्यातील आवारपूर, नांदा, आवारपूर, नोकारी, पालगाव तसेच इतर गावातील सरपंच, उपसरपंच व ग्राम पंचायत सदस्यांनी अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या विरोधात आमरण उपोषण सुरू केले आहे. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी मुंडण करून सिमेंट कंपनीच्या विरोधात तीव्र रोष व निषध व्यक्त केला.
दत्तक सरपंच संघटनेच्या वतीने आंदोलनाच्या पहिल्या दिवशी ग्राम पंचायत सदस्य रत्नाकर चटप, उपसरपंच बाळकृष्ण काकडे यांनी आमरण उपोषणाला सुरवात केली आहे. कोरपना तालुक्यातील नांदा, अवारपुर, नोकारी, पालगाव या गावातील जमिनीवर उभी असलेली आवारपूर येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनीने परिसरातील आवारपूर, नांदा, बीबी हिरापूर सांगोडा, पालगाव, नोकारी, बाखर्डी, तडोधी, भोयेगाव ही गावे दत्तक घेतलेली आहे.
आणखी वाचा-पश्चिम विदर्भातील ३५ टक्के पशुपालन संस्था अवसायनात
येथे ४० वर्षापासून कंपनीचा कारखाना आहे. मात्र २०२० ते २०२३ या तीन वर्षात कंपनीने सदर दत्तक गावांमध्ये सामाजिक दायित्व निधी खर्च करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केल्याचा आरोप सरपंचानी लावला आहे. सिमेंट कारखान्यामुळे गावातील लोकांना सुविधा मिळण्या ऐवजी आरोग्य, पाणी आणि मूलभूत सुविधांचा प्रश्न निर्माण झाला आहे. कंपनीच्या प्रदूषण तसेच ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्याची अवस्था बिकट झालेली आहे. अपघाताचे प्रमाणही वाढत चाललेले आहे. याबाबत दत्तक गावातील सरपंच उपसरपंच सदस्यांनी कंपनी प्रशासनाकडे विविध विकास कामांची मागणी केली. मात्र कंपनी याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करित असून दत्तक गावांसाठी सी. एस. आर. मार्फत खर्च केल्या जाणारी निधी इतरत्र वळवून वाटेल त्या पद्धतीने खर्च करीत आहे. तीन दिवस साखळी उपोषण करुनही काहीच तोडगा निघत नसल्याने गुरूवारी कंपनी विरोधात मुंडन करुन आमरण उपोषण सुरू करण्यात आले.
अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवाळपूर तथा माणिकगड गडचांदूर येथून होणारी लाईम स्टोनची वाहतूक तात्काळ थांबवावी, सी. एस. आर. निधी दत्तक गावांना मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात यावा, दत्तक गावातील स्थानिक बेरोजगारांना रोजगार द्यावा, कंत्राटी कामगारांना देण्यात येणारा दिवाळी बोनस मध्ये तात्काळ वाढ करावी आदी विविध मागण्या कंपनीकडे केल्या आहेत. आंदोलनात नांदा येथील सरपंच मेघा नरेश पेंदोर, उपसरपंच प्रा. आशिष देरकर, सरपंच प्रियंका दिवे, उपसरपंच बालाकृष्णा काकडे , सरपंच अरुण रागिट, सरपंच सुनिता तुमराम, सरपंच संजना सचिन बोंडे, सरपंच शालीनी बोंंडे, सरपंच ज्योती जेनेकर, सरपंच संगिता झित्रु मडावी, उपसरपंच ज्योती धोटे, उपसरपंच अरुण काळे, सरपंच निर्मला मरस्कोल्हे , आशा खासरे, मंगला गायकवाड, सुजाता चौधरी, सुनिता आत्राम, जयश्री ताकसांडे, सुषमा गेडाम, माया मडावी, संतोषी माहुलीकर यांनी आंदोलन सुरू केले आहे.